बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये मोठी कारवाई केली सुमारे ३५ लाखाच्या मशिन्स आणि साहित्य जप्त केले आहे. तसेच ३ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याची तक्रार असल्याने वन विभागालाही त्याबाबत पत्र दिले आहे. बेकायदेशीर वाळू उपसा थांबला पाहिजे, अशी ताकीद प्रत्येक तहसीलदारांना दिली आहे. यापुढे नियमबाह्य वाळू उपशाबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही, कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी वाळू माफियांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाळू लिलावाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधीचा महसुल मिळतो. बदलत्या वाळू धोरणाचा या लिलाव प्रक्रियेला फटका बसला आहे. आता तीन खाड्यांमधील वाळू लिलावाच्या काही गटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अजूनही काही गटांचा लिलाव झालेला नाही.
यामुळे प्रशासनाला महसूलाची चिंता आहे, अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात काही ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये संगमेश्वर, करजुवे, रत्नागिरी पांढरा समुद्र आदी ठिकाणच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या आहेत. त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे होणाऱ्या बेकायदेशीर आणि बेसुमार वाळू उपशाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, संगमेश्वरमध्ये होणार्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही तत्काळ कारवाई केली आहे. या कारवाईत मशीनसह सुमारे ३५ लाखाचे साहित्य जप्त केले आहे. ३ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भविष्यात अशा प्रकारे बेकायेदशीर वाळू उपसा होऊ नये, यासाठी तहसीलदाराना सूचना दिल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारे बेकायदेशीर वाळू उपसाबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही. काही राजकीय लोकांचा वरदहस्त असल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर श्री. जिंदल म्हणाले, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझे उद्दीष्ट सरळ आहे. बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे दिसल्यास कारवाई होणार. रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथे बेकायदेशीर पांढऱ्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. शासनाचीच ही वाळू काही लोक चोरून विकत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तसे असल्यास त्याची माहिती घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल. अशा बेकायेदशीर वाळू उपशाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास सांगा, यावर तत्काळ कारवाई होईल.

