पाचलमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना पकडण्यात आले आहे. ते गोवंशांची वाहतूक करत असल्याचे आढळले असून १३ जनावरांसह त्यांच्याकडून १२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. जिल्हा पोलीस प्रमुख नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी. महाम नी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक २२ सप्टेंबर रोजी लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचल ते जवळेथर रोड ने गगनबावडां घाटामार्गे जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पाचल येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.
१३ जनावरे – या तपासणीदरम्यान, टाटा कंपनीची गाडी थांबवण्यात आली आणि तिची तपासणी केली असता, गाडीच्या हौद्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने, दोरीने बांधलेली एकूण १३ जनावरे आढळून आली. पोलिसांनी गाडीच्या चालकाकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. सलमान मुस्ताक बलबले (वय ३५, रा. बलबले मोहल्ला, राजापूर) आणि संजय दत्तराम पाटणकर (वय ४८, रा. रा. कुंभवडे रामणवाडी, राजापूर) अशी कारवाई केलेल्या दोन संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले. चौकशीत त्यांनी ही जनावरे तळगाव कोंडे येथील काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून आणल्याचे सांगितले, अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ जनावरांची सुटका केली असून, आरोपींकडून एक वाहन आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण १२,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो. फौ. सुभाष भागणे, पो.हवा. नितीन डोमणे, पो. हवा. पालकर, पो.हवा. कदम आणि पो.हवा. प्रवीण खांबे यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.