रेल्वे प्रवासादरम्यान सहकारी प्रवाशाला शितपेय आणि वेफर्समधून गुंगीचे औषध देत हजारोंचा मुद्देमाल लांबवण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार ७ एप्रिल रोजी मडगाव नागपूर स्पेशल ट्रेनमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान हा प्रकार घडला. नुकतीच या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शुक्रवारी तक्रार देणारे प्रवासी मडगाव नागपूर स्पेशल ट्रेनने प्रवास करत असताना दोन अज्ञातांनी त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे थांबवली असता संशयितांनी फिर्यादींना आपल्याकडील शितपेय आणि वेफर्स खायला दिले. संशयितांनी शितपेयात गुंगीचे औषध मिळसल्याने फिर्यादी यांना काही वेळाने झोप लागली. या संधीचा फायदा घेत दोन्ही संशयितांनी त्यांच्या पाकिटातील रोख रक्कम आणि गळ्यातील सोन्याची चेन असा हजारोंचा मुददेमाल लांबवला. ग्रामीण पोलिसांनी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम ३२८, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.