धबधब्यांचे पर्यटकांना प्रचंड आकर्षण असते. वीकेंडला पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी पर्यटक धबधब्यांकडे वळतात. अतिउत्साह, टवाळखोरांचा धिंगाणा, मद्यपींची भीती आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी टाळणे यावर भर दिला पाहिजे. चिंब भिजण्याचा आनंद लुटतानाज स्वतःच्या सुरक्षेचाही विचार करा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नेहमीच्या दगदगीतून थोडासा विरंगुळा म्हणून आता लोक निसर्ग पर्यटनाकडे वळत आहेत. तालुक्यात निवळी, भोके, चिंचखरी, उक्षी, पानवल, हरचिरी येथे अनेक धबधबे आहेत. पावसाने उसंत घेतल्यामुळे प्रवाहित धबधब्यांवर गर्दी होऊ लागते. शनिवार, रविवारी ही गर्दी सर्वाधिक असते. तेथे जाण्यासाठी रस्ते नाहीत.
पायवाटा, जंगलातून मार्ग काढत कसरत करत जावे लागते. अचानक पावसाळी पर्यटनाचा या नव्या आकर्षणामुळे धबधब्यांवर गर्दी होते. काही अतिउत्साही तरुण तर प्रचंड पाऊस पडत असला तरी धबधब्याच्या पाण्याखाली डुंबण्याचा प्रयत्न करतात; परंतु पावसामुळे धबधब्यांचे पाणी वाढल्याचे लक्षात येत नाही. त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून जाण्याची भीती असते. पाण्याबरोबर डोक्यात काही पडण्याचीही शक्यता असते. निवळी धबधब्यात असा प्रकार घडला होता. यामध्ये तिघांचा वाहून मृत्यू झाला होता. काही तरुणांचे ग्रुप धिंगाणा घालतात, तर काही पर्यटक अशा आल्हाददायक वातावरणात झिंग येण्यासाठी बेकायदेशीर मद्यपान करतात आणि रंगाचा बेरंग होतो. वादविवादासह कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो.
अशी हवी सावधानता – 1)धोकादायक ठिकाणी न जाणे 2) नदी, ओढ्यात उड्या टाळणे 3) सुरक्षितपणे भिजावे 4) धूम्रपान, मद्यपान करु नको 5) कड्यावरून उड्या न मारणे 6) सांडव्यावरून उड्या टाळणे