तालुक्यात अपुऱ्या एसटी फेऱ्यांमुळे विद्यार्थांना पायपीट करावी लागत आहे. महामंडळच्या अनेक गाड्या नादुरुस्त आहेत. गाडी वेळेवर सुटत नाही, अशा सर्व तक्रारी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी रत्नागिरी एसटी आगारात धडक मारली. चार दिवसांत फेऱ्या नियमित सुरू न केल्यास गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू, असा इशारा तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी दिला. रत्नागिरीचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्याशी शिवसैनिकांनी चर्चा केली. रत्नागिरी तालुक्यात अनेक एसटी बसफेऱ्या कोरोना काळापासून एसटी प्रशासनाने बंद केल्या.
आजही ग्रामीण भागातील त्या एसटी बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतील या बसफेऱ्या सोयीच्या ठरत असतात. रत्नागिरी तालुक्यातील उंबरे, हरचेरी, भोके, चिंद्रवली, मिरजोळे, आदी भागांतील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ येत आहे. सार्वजनिक वा रविवार सुटीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद ठेवल्या जातात. हा काय प्रकार, कोणाच्या सांगण्यावरून हे केले जात आहे, असा सवाल शिवसैनिकांनी केला. या सर्व भोंगळ कारभाराचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामस्थांना बसत आहे.
कोरोनानंतर रत्नागिरी शहर, तसेच ग्रामीण भागातील अनेक वाहतुकीच्या बसफेऱ्या कमी करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे; मात्र प्रवासी भारमान कमी असल्याचे सांगत या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. या होणाऱ्या गैरसोयींबद्दल शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, महेंद्र झापडेकर, राकेश साळवी, प्रसाद सावंत, विजय देसाई, चंद्रशेखर मांडवकर, दत्ताराम इरीम, नासीर मुकारी, विनोद उकिर्डे, भोके आदी उपस्थित होते.