या अगोदरच्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत षटकामागे ८.२२ च्या सरासरीने धावा करून कसोटी क्रिकेटला नवी दिशा देणाऱ्या भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर हाराकिरी स्वीकारली. अवघ्या ४६ धावांत पूर्ण संघ गारद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर तीन बाद १८० अशी मजल मारली. ढगाळ हवामानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा रोहित शर्माचा निर्णय चांगलाच बुमरँग झाला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी अफलातून मारा करून भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवली. मॅट हेन्री (१५ धावांमध्ये पाच बळी) आणि विल ओरुकी (२२ धावांमध्ये चार बळी) मिळून भारताचा पहिला डाव ३१.२ षटकांत अवघ्या ४६ धावांमध्ये गुंडाळला.
गोलंदाजांच्या मेहनतीवर कमान चढवताना सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने ९१ धावांची खेळी उभारून न्यूझीलंड संघाला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुस्थितीत नेऊन ठेवले. विराट कोहलीसह भारताचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत, इतकी दयनीय अवस्था झाली. गुरुवारी सकाळी बंगळूर शहरावरील गड़द पावसाळी ढगांची गर्दी दूर झाली होती आणि पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ चालू करायला योग्य परिस्थिती निर्माण झाली. भारतीय संघात दोन बदल केले गेले. मान आखडल्याने शुभमन गिलच्या जागी सर्फराझ खान आणि आकाश दीपच्या जागी कुलदीप यादवला पसंती दिली गेली. रोहित शर्मान नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला.
नाणेफेकीच्या वेळी बोलणाऱ्या रवी शास्त्रींनी, मी कप्तान असतो तर गोलंदाजी करणे पसंत केले असते; पण खेळपट्टी कोरडी वाटत असल्याने रोहितने फलंदाजीचा निर्णय घेतला असावा, असे मत त्यानंतर व्यक्त केले. गोलंदाजी करायला मैदानात उतरलेल्या किवी संघाने मारा कसा करायचा याची पक्की योजना आखली होती. खेळ चालू झाल्यावर लगेच समजून चुकले की खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत आहे. चेंडू स्वींग होत होता उसळीही घेत होता. त्यातून काही कारण नसताना उगाच घाई करायची सवय रोहित शर्माला नडली. टीम साऊदीला उगाच पुढे सरसावत खेळताना रोहितच्या बॅट पॅडच्या पटीतून चेंडू जाऊन स्टंपवर आदळला.
उंच्यापुऱ्या विल ओरुकीचा टप्पा पडून काहीसा उसळणाऱ्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. विराटने मागे रेलत खेळायचा चेंडू पुढे पाऊल टाकत खेळायची चूक केली होती. कसोटी सामना खेळायची हाती आलेली संधी सर्फराझ खानने अव्हेरली, जेव्हा त्याने मारलेला आततायी फटका चुकला.
जयस्वाल – रिषभ पंत जोडीने काही काळ तग धरायचा प्रयत्न केला. जयस्वालचा अफलातून झेल पकडला गेला आणि त्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. मॅट हेन्री आणि विल ओरुकीने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तब्बल पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. परिणामी, भारताचा संपूर्ण डाव ३१.२ षटकात ४६ धावांमध्ये आटोपला गेला. मॅट हेन्रीने पाच तर ओरुकीने चार फलंदाजांना बाद करून न्यूझीलंड संघाला अचानक चांगली पकड सामन्यावर मिळवून दिली. किवी गोलंदाजांना त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ प्रेक्षकांच्या लक नजरेत भरली इतकी काही अफलातून झेल न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पकडले. ज्या खेळपट्टीवर भारताचा डाव ४६ धावांमध्ये आटोपला तिथेच कॉनवे- लॅथम जोडीने अर्धशतकी सलामी दिली. सात धावांवर लॅथमचा सोपा झेल के. एल. राहुलने चेंडू दिसलाच नाही म्हणून प्रयत्नच केला नाही. में ६७ धावा जमा झाल्यावर कुलदीप यादवने लॅथमला पायचित केले.
सुमार क्षेत्ररक्षण – रिषभ पंतने दोन कठीण स्टम्प करायच्या संधी दवडल्या तर रोहित शर्माने यंगचा झेल सोडला. धावबाद करायची एक संधी जडेजाने गमावली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने भारतात खेळण्याचा अनुभव वापरून भारतीय फिरकी जे गोलंदाजांना सहजी तोंड दिले. ११ चौकार तीन षटकार मारून ९१ धावांची खेळी कॉनवेने केली. कॉनवेने स्वीपच्या फटक्याचा प्रभावी वापर केला. अश्विनने दुसऱ्या टप्प्यात गोलंदाजीला आल्यावर कॉनवेला बोल्ड करून मोठा दिलासा संघाला दिला.