सध्या सुरु असलेल्या एक दिवशीय सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंची जबरदस्त खेळी दिसून येत आहे. भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने अफलातून खेळी केली. मात्र या दरम्यान रोहित शर्माचा पुल शॉटवर चेंडू थेट सीमा रेषेच्या पलीकडे गेला आणि स्टँडवर बसलेल्या एका लहान मुलीला लागला. त्यामुळे पाचव्या षटकानंतर काही काळ सामना थांबवावा लागला.
रोहित शर्माने भारतीय डावाच्या पाचव्या षटकात डेव्हिड विलीचा चेंडूवर जबरदस्त षटकार लगावला. चेंडू पार मैदानाच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांच्या मधोमध बसलेल्या एका छोट्या मुलीला लागला. पंचांनी षटकाराचा इशारा दिल्यानंतर कॅमेरामनने पुन्हा कॅमेरा स्टँडकडे वळवला असता, त्या चिमुरडीला चेंडू लागल्याचे सर्वांना कळल.
या घटनेनंतर इंग्लंडच्या फिजिओ स्टाफ मुलीवर उपचार करण्यासाठी धावत गेला, त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहतेही इंग्लंडच्या फिजिओ स्टाफचे कौतुकही करत आहेत. रोहित शर्माने सामना संपल्यानंतर, स्वत: त्या मुलीकडे जाऊन, तिला एक चॉकलेटही भेट म्हणून दिले आणि काळजी घेण्यास सांगितले.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली. या सामन्यात त्याने ५८ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतासमोर केवळ १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले.