भारतीय खेळाडूंनी पौरस पॅरालिंपिकमधील अॅथलेटिक्स प्रकारात घवघवीत यश संपादन केले. भारतीय खेळाडूंनी मंगळवारी मध्यरात्री उंच उडी व भालाफेक प्रकारात एकूण चार पदकांची कमाई केली. उंच उडीमध्ये शरदकुमारने रौप्यपदक आणि मरियप्पन थांगवेलू याने ब्राँझपदक पटकावले. भालाफेकीत अजित सिंगने रौप्यपदक, तर सुंदर सिंग याने ब्राँझपदक जिंकले. उंच उडी (टी ६३) या प्रकारात शरदकुमार याने १.८८ मीटर उंच उडी मारत रौप्यपदकाची कमाई केली.
मरियप्पन थांगवेलू याने १.८५ मीटर उंच उडी मारत ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. शरदकुमार याने या वेळी पॅरालिंपिकमधील विक्रम नोंदवला. जागतिक विक्रम नावावर असलेल्या इजरा फ्रेच याने १.९४ मीटर उंच उडी मारताना पॅरालिंपिक विक्रमासह सुवर्णपदकही आपल्या नावावर केले.
अदलाबदली – टोकियो पॅरालिंपिकमध्ये मरियप्पन थांगवेलू व शरदकुमार या दोघांनीच भारताला उंच उडी या प्रकारात पदके जिंकून दिली होती. यंदाही या दोघांकडूनच पुनरावृत्ती झाली आहे.