जेष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर ‘विषयी खळबळजनक दावा केला आहे. ऑपरेशन सिंदूर ज्यादिवशी सुरू झाले त्या पहिल्या दिवशीच भारताचा पराभव झाला, पाकिस्तानने भारताची विमाने पाडली होती असा मोठा दावा करत चव्हाण यांनी जणूकाही नवा शाब्दिक बॉम्ब फोडला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने आणि भारतासह जगभरातील राजकीय घडामोडींचा आणि कायदे कानूनांचा गाढा अभ्यास असणाऱ्या नेत्याने हा दावा केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. राजकारणही चांगलेच तापले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरु केली होती. ७ मे रोजी भारतीय वायु दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिहल्ला चढवत भारतातील काही शहरांवर द्रोणने हल्ले केले. त्याला देखील भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. ३ दिवस हे युद्ध सुरू असताना अचानक १० मे रोजी भारताने तात्पुरता युद्ध विराम केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केली आणि भारत – पाकिस्तानमधील युद्ध थांबविले असा दावा केला होता. त्यामुळे देखील वाद झाले. सरकारने ट्रम्प यांचा दावा फेटाळला. ऑपरेशन सिंदर संपलेले नाही तर घेतली. त्यावरून देखील राजकारण चांगलेच तापले होते.
पृथ्वीराज चव्हाणांचा बॉम्बस्फोट – या साऱ्या पाश्वंभुमीवर जेष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जणूकाही नवा बॉम्ब फोडला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजकारण तापले आहे. आपल्या विधानावर आपण ठाम आहोत, माफी मागण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी म्हटले आहे.
नेमके चव्हाण काय म्हणाले?- पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी म्हणजे ७मे २०२५ रोजी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता. ७ तारखेला जे हवाई युद्ध झाले, ते अर्ध्या तासाचे झाले. पहिल्या दिवशी आपला पूर्ण पराभव झाला होता. कोणी मान्य करो अथवा न करो. पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारताची विमानं पाडली. त्यानंतर भारताचा संपूर्ण एअरफोर्स ग्राऊंड झाला. त्यानंतर भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही. भारतीय वायूदलाचे विमान कुठेही उडाले नाही. ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरुन एकही विमान उडाले नाही. कारण त्याठिकाणी पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती.
अर्ध्या तासांत पराभव – ७ मे च्या दिवशी अर्ध्या तासात आपला पूर्ण पराभव झाला होता. अर्धा तास हवाई युद्ध चाललं त्यात आपली विमानं पाडण्यात आली होती. भारताकडून त्यावेळी एअरफोर्स ग्राऊंड करण्यात आलं. कुणी मान्य करा किंवा करु नका. कुठलंही विमान त्या दिवशी उडालं नाही. ग्वाल्हेर, भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथे कुठेही विमान उडालं नाही. जर या ठिकाणी विमान उडालं असतं तर ते पाकिस्तानने पाडलं असतं असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
सैन्य किती आहे ? – १२ लाख सैन्य आहे, २५ लाख सैन्य आहे की १ कोटी सैन्य आहे याला काही अर्थ नाही. कारण युद्धच होणार नाही. तुम्हाला कुणी युद्ध करुच देणार नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये हेच आपण पाहिलं. हवाई युद्ध झाल, मिसाईल युद्ध झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही. हवाई युद्धं झाली, पुढची युद्धंही तशीच होणार आहेत. मग आपल्याला १२ लाख लष्कर ठेवण्याची काही गरज आहे का? त्यांच्याकडून दुसरं काहीतरी काम करुन घेऊ आपण असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
कारगील युद्धावेळीचा करार – कारगीलचं युद्ध झालं. तेव्हा बिल क्लिटंनचे फोन येत होते की युद्ध थांबवा. आत्ताही ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा ट्रम्पचे फोन येत होते. ट्रम्पनी ते युद्ध थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. मोदींनी ते सगळं मान्य केलं कारण आपला पराभव पहिल्या दिवशी झाला होता. लष्कर पुढे जाऊ शकलं नाही कारण अमेरिकेशी असा अलिखित करार झाला आहे की एकमेकांच्या सीमा पार करायच्या नाहीत. त्यामुळे भारतीय लष्कर पुढे जाऊ शकलं नाही. कारगील युद्धाच्या वेळी हा करार झाला होता. ती अट आजही पाळली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर का केली? मोदींवर नेमका कसला दबाव आहे? ते का म्हणाले नाहीत की आम्ही अजून एक दिवस पाकिस्तानचं नुकसान करणार आहोत. याचं उत्तर सगळ्यांनी शोधलं पाहिजे असंदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
मोर्दीवर अमेरिकेचा दबाव – आमच्याकडे काही तर्क आहेत. पण आमच्याकडे पुरावे नाहीत. पण ताँबाबत इतकंच सांगेन की मोदींवर सध्या अमेरिकेचा फार मोठा दबाव आहे आणि मोदी हतबल आहेत. परराष्ट्र खात्याची जी पिछेहाट झाली ती कुणाला सांगायची गरज नाही. शिवाय पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी डोक्यावर बसवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
माफी मागण्यास नकार – दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मात्र आपण जे बोललो त्यावर ठाम आहोत, माफी मागण्याचा प्रश्नच नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.

