सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसांत झाली, याचे ट्रॅकिंग व्हावे. जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली विकासकामे, रुग्णवाहिकांचा सरासरी वेळ, रस्त्यांची दरदिवशीची स्थिती अशी जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची माहिती एका क्लिकवर जनतेला मिळावी त्यासाठी जिल्ह्याचा एकत्रित डॅशबोर्ड तयार करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर जिल्ह्याचा सर्व विभागांच्या एकत्रित माहितीचा डॅशबोर्ड तयार करावा. पेपरलेस कार्यप्रणाली राबवण्याच्या दृष्टिकोनातून तो बनवावा. लोकप्रतिनिधींच्या निधीतून झालेली कामे, मागणीपत्रावर अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही लोकांना समजली पाहिजे.
रुग्णवाहिकेला कॉल गेल्यानंतर अंतर लांब असेल तर ४५ मिनिटांत त्या रुग्णावर उपचार व्हायला हवेत. शहरी भागात हाच कालावधी १५ मिनिटांवर यायला हवा. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पोलिस विभागाशी चर्चा करून रुग्णवाहिकांचे ठिकाण ठरवावे. हब कॉम टेक्नोसिस्टीमचे आदेश सुर्वे यांनी या डॅशबोर्डबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्राणीसंग्रहालयाचे कामकाज – सामंत यांनी मालगुंड येथील नियोजित प्राणीसंग्रहालयाबाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, सध्या पावसाळा सुरू आहे. या कालावधीत जे प्रशासकीय कागदपत्रीय कामकाज राहिले असेल ते पूर्ण करून घ्यावे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्षात गतीने कामकाजाला सुरवात व्हायला हवी. त्याबाबतचे सादरीकरण मुंबई येथे करावे, अशी सूचनाही त्यानी दिली.