कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये कांदळवन प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. चार तासांसाठी झालेल्या कार्यशाळेसाठी साडेसात लाख रुपये खर्च करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कांदळवन विभाग आणि वनविभागाकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. समुद्रात जाळ्यामध्ये प्राणी अडकला तर त्याची सुटका कशी करावी, नुकसान झाले तर त्याची भरपाई कशी मिळवावी, किनाऱ्यावर अडकलेल्या डॉल्फिन माशाला कसे रेस्क्यू करावे, याचे प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेसाठी सुमारे १० लाखांची आर्थिक तरतूद होती. त्यासाठी पोलिसदल, कस्टम, कोस्टगार्ड, मत्स्यविभाग, मच्छीमार सोसायटी, सुरक्षादल आदींना बोलावण्यात आले होते. सुमारे १३० लोक या कार्यशाळेला उपस्थित होते.
कांदळवनाचे संरक्षण कसे करावे, त्याचे काय फायदे-तोटे आदींबाबत याची माहिती देण्यात आली. डॉल्फिन माशाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. या प्रतिकृतीच्या माध्यमातून मच्छीमारांच्या जाळ्यात मासा अडकला तर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले. चार तासांच्या या प्रशिक्षणासाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. वास्तविक शासकीय विश्रामगृहासह शासनाच्या विविध हॉलमध्ये हा कार्यक्रम घेता आला असता यातून शासनाच्या पैशाची बचत झाली असती; परंतु चार तासांसाठी साडेसात लाखांचा चुराडा केला आहे. शासकीय पैशाच्या उधळपट्टीबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. अशाप्रकारे पैशाचा चुराडा केल्याप्रकरणी त्या कार्यशाळेची चौकशी करण्याचे आदेश सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
१३० जणांची उपस्थिती – कार्यशाळेसाठी सुमारे १० लाखांची आर्थिक तरतूद होती. त्यासाठी पोलिसदल, कस्टम, कोस्टगार्ड, मत्स्यविभाग, मच्छीमार सोसायटी, सुरक्षादल आदींना बोलावण्यात आले होते. सुमारे १३० जण या कार्यशाळेला उपस्थित होते.