छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उद्या बुधवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उद्घाटनानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून सकाळी 8 वाजता ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने उद्या होणाऱ्या पदयात्रेच्या पूर्वनियोजनासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसिलदार राजाराम म्हात्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन कर्पे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे आदी उपस्थित होते. उद्या होणाऱ्या पदयात्रेत एन.सी.सी, एन.एस.एस, नेहरु युवा केंद्र, स्काऊट गाईड, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असणार आहे.
ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ही पदयात्रा टिळक आळी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी येईल. तेथून शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ला मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथे समारोप होणार आहे. या पदयात्रे दरम्यान मांडवी समुद्रकिनारा येथे श्रमदान करण्यात येणार आहे. ढोल व लेझीम पथक, विविध स्तरावरील पुरस्कारप्राप्त खेळाडू सहभागी होणार आहेत. उपविभागीय स्तरावर देखील असे नियोजन होणार आहे.