कोकणामध्ये विविध खेळांमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची दखल आत्ता मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत चमकू लागले आहेत. त्यामुळे कोकण विभागाचे नाव सुद्धा उंचावत आहेत.
जानवली ता.कणकवली जि. सिंधुदुर्ग गावचे सुपुत्र प्रणय राणे यांची प्रो कबड्डीमध्ये यु मुंबा संघात निवड झाली. त्याच्या कार्यकतृत्वाने कणकवलीचे नाव राज्यात चमकल्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे. शिवाय त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कणकवली शहराच्यावतीने या अभूतपूर्व यशाबद्दल प्रणय राणे याचा सत्कार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला. यावेळी गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, राजा पाटकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, राजू गवाणकर, विशाल डांमरी, बाबू आर्डेकर, ओमकार राणे आदी उपस्थित होते.
प्रणय राणे यांनी देखील ग्रामस्थासमोर आपला अनुभव कथन केला. ते म्हणाले, माझ्या यशात शाळेचा, मार्गदर्शक शिक्षकांचा आणि त्यांनी केलेल्या संस्काराचा खूप मोठा वाटा आहे. एस.एम.हायस्कूलच्याच मैदानावरूनच माझ्या कबड्डी खेळाची सुरुवात झाली.
प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत एस.एम. हायस्कूलचा विद्यार्थी आणि कबड्डीपटू असलेल्या प्रणय राणेचा हायस्कूलच्यावतीने गौरवण्यात आले. संस्थेचे सचिव डी.एम.नलावडे, प्राचार्य वायंगणकर, उपमुख्याध्यापक कांबळे, क्रीडा शिक्षक प्रधान आदींनी त्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी भारावून गेले. फोटो आणि स्वाक्षरीसाठी विद्यार्थ्यांनी प्रणय भोवती गर्दी केली. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉ. तायशेटे, उपकार्याध्यक्ष काणेकर यांनी ही शुभेच्छा दिल्या. सौ. पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.