28.3 C
Ratnagiri
Saturday, August 9, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeChiplunमुंबई - गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास अंधारातूनच

मुंबई – गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास अंधारातूनच

नाल्यापर्यंतच्या भागावर माती असल्याने पावसाळ्यात वाहनांची चाके रुतण्याचा धोका आहे.

चौपदरीकरण झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांची सोय नाही. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत. चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चिखलात चाके रुतण्याचा धोका कायम आहे. असे असताना केवळ सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला म्हणजे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा आव महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीकडून आणला जात आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा हीच गोष्ट पटवून देत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या कामांमुळे त्रास होऊ नये म्हणून सात महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा दौरा केला होता. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी महामार्गाची पाहणी करून चौपदरीकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला; मात्र मंत्र्यांच्या पाहणीनंतर पावसाळा आला आणि पावसाळ्यात पुन्हा या मार्गाचे काम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढिम्म झाले आहे.

काम पूर्ण झालेल्या ठिकाणी पथदिवे नाहीत. तसेच काँक्रिटचा रस्ता संपल्यानंतर नाल्यापर्यंतच्या भागावर माती असल्याने पावसाळ्यात वाहनांची चाके रुतण्याचा धोका आहे. खेरशेत येथील टोलनाका परिसरात अंधार असल्यामुळे येथे यापूर्वी अपघात झाले होते. त्या ठिकाणी आता विजेचे दिवे बसवण्यात आले आहेत. सावर्डे बाजारपेठेत दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, उक्षी, संगमेश्वर बाजारपेठ, आरवली, चिपळूण शहरातून जाणारा मार्ग, बहादूरशेख नाका, लोटे, आवाशीसह अनेक ठिकाणी रात्री महामार्गावर अंधार असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट पुण्यात दीड तासात पोहोचण्यासाठी नव्या रस्त्याची आखणी करत असल्याची घोषणा केली; मात्र गेल्या १२ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम केंद्र व राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही.

कोकणवासीयांनी याविषयी अनेक आंदोलने केली. कोकणचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमधील जेएनपीटी महामार्गावरील पळस्पे उड्डाणपुलावरील खड्डे तसेच पळस्पे येथील पुलाखालील खड्डे दृष्टीआड व्हावेत, अशाप्रकारे मंत्र्यांच्या दौऱ्याची आखणी केली जाते. तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव, कोलाड, रोहा या तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा या पल्ल्यावर अक्षरशः रस्त्यामुळे वाहतूककोंडी आणि उंच सखल खड्ड्यांमुळे मोटारीतील प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत. पाहणी करण्यासाठी मंत्री येणार असे समजल्यास महामार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करून त्यावर मुलामा दिला जातो. मागील अनेक वर्षांपासून असेच सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular