गेले काही दिवस जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात धुके आणि थंड वातावरण तर दुपारी कडकडीत ऊन यामुळे हापूस कलमांवर लागलेली शेंगदाण्याएवढी कैरी पिवळी पडून गळून जात आहे. यंदा जानेवारी महिन्यात नैसर्गिकरीत्या मोहोर येण्याचे प्रमाण अल्प असल्याने मे महिन्यातील उत्पादन कमी राहील, अशी शक्यता आंबा बागायतदारांनी वर्तवली आहे. यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे; मात्र बदलत्या हवामानामुळे मोहोराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आंबा फवारणी करूनही गळती थांबत नसल्याने अपेक्षेपेक्षा यंदा आंबा हंगाम कमी कालावधीचा राहील. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कलमांना मोहोरच आलेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन अत्यल्प राहिली.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या मोहोरावर मार्चअखेरीस उत्पादनाला सुरुवात होईल. यामधून एप्रिल महिन्यात आवक चांगली राहिल. पुढे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आंबा आवक कमी होत जाईल, असा बागायतदारांचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे; मात्र किमान तापमान १३ ते १७ अंशापर्यंत आहे. या तफावतीचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे. बहुसंख्य बागांमध्ये झाडांवर बारीक कैरी दिसत आहे. दुपारच्या उन्हामुळे बारीक कैरीची गळ होत आहे तसेच तुडतुडा, थ्रिप्स, करपा आणि बुरशी या रोगांचा प्रादूर्भाव ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे त्यापासून आंबापिकाचे संरक्षण करण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे.
फळगळ रोखण्यासाठीचे उपाय – तापमानात होणाऱ्या बदलामुळे फळगळ वाढण्याची शक्यता आहे. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या फळाची गळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रत्येक झाडाला द्यावे. ते १५ दिवसातून एकदा दिले तर त्याचा फायदा होईल, तसेच झाडाच्या बुंध्याभोवती, अळ्यांमध्ये झाडाच्या पानांचे आच्छादन करावे. आंबाफळाची गळ कमी करण्यासाठी आणि फळांची प्रत राखण्यासाठी पोटॅशिअम, नायट्रेटची फवारणी करावी, अशा सूचना कोकण कृषी विद्यापीठाने दिल्या आहेत.