आजकालची मुल मोबाईल अथवा कॉम्प्युटर एवढ्या सहजतेने हाताळतात कि काही वेळेला मोठ्यानाही काही गोष्टी त्यातील माहित नसतात त्या त्यांच्याकडून ज्ञात होतात. पण मुलांना या वयात लागलेलं हे टीव्ही आणि मोबाईलच व्यसन योग्य आहे का? त्याचे होणारे दुष्परिणाम किती आणि कोणते आहेत त्याबद्दल खरचं पालक अनभिज्ञ आहेत का!
पालकांच्या मोबाईलवर तासनतास घालवणारी मुले हि अगदी २ वर्षापासून ते १५ वर्षापर्यंतची असतात. त्यानंतर मुलांना त्यांच्या आवडीनुसार स्वतः पालक महागडा मोबाईल घेऊन देतात. आणि राहिला प्रश्न लहान मुलांचा तर पालकांचा मोबाईल स्वत:चा असल्याप्रमाणे वापरला जात असतो. त्यात जर पालक वर्किंग असतील तर संध्याकाळी मुल घरी आल्यावर फक्त मोबाईल घरी येणार म्हणून खुश झालेली दिसतात. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या प्रथम मोबाईलची मागणी पालकांकडे केली जाते.
अनेक पालक मुलांनी शांत बसावं म्हणून त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. मात्र, मुलांनी शांत बसावं म्हणून स्मार्टफोन देणं त्याचं भविष्य धोकादायक करत आहे. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देणं म्हणजे ड्रग्ज देण्यासारखं आहे. एकदा व्यसन लागले कि, सुटताना कठीण. मुलांना स्मार्टफोनच्या व्यसनात पालक स्वत:च ढकलत असल्याचे दिसून येत आहे.
स्मार्टफोनवर गेम खेळणारे चिमुरडे आई-वडिलांसोबत खूपच कमी वेळ व्यतीत करतात. तंत्रज्ञानाच्या सहवासात आल्यानंतर चिमुरड्यांच्या मानसिक विकास खुंटतो. तांत्रिक गोष्टी अनेक समजतात पण सततच्या मोबाईलच्या वापरामुळे बुद्धीवर त्याचा परिणाम होतो. स्मार्टफोनवर जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांच्या गतीमध्ये शिथिलता येऊन क्रिएटिव्हिटी मंदावते. एकाच जागी बरेच तास बसून अथवा झोपून स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांची शारीरिक हालचालही घटल्याने, अनेक शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांच्या वेळेपेक्षा मोबाईल जास्त वेळ देत असल्याचे मुलांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे वेळीच अशी तांत्रिक व्यसने दूर केलेली कधीही चांगली.