वातावरणातील वारंवार होणार्या बदलामुळे, झाडांना पहिल्यांदी आलेला मोहोर गळून पडला आहे तर काही ठिकणी डबल मोहोर आला आहे. सध्या आंबा, काजूचा हंगाम असल्याने, आणि वातावरणात गारठा असल्याने मोहोर फुलायचा चांगला काळ आहे. मधीच पाउस पडल्याने फळझाडांवरील मोहोर कुजायला सुरुवात झाली होती तर काही ठिकाणी गळून पडायला लागला होता.
प्रचंड प्रमाणात आलेल्या मोहोराला फळधारणाच झालेली नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती उदभवलेली असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. मोहोरातून फळधारणा व्हावी, यासाठी बागायतदारांनी किटकनाशकांची फवारणी कमी करा, अशा सूचना कोकण कृषी विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे केली आहे.
मोहोर आल्यानंतर बरेच दिवस तापमान १५.९ सेल्सिअसपेक्षा कमी राहिल्यामुळे मोहोरातील संयुक्त फुलांचे प्रमाण कमी होवून नर फुलांचे प्रमाण वाढले आहे. या कालावधीत औषधांची फवारणी करण्यात आल्यामुळे फळधारणा होण्यासाठी बागेतील परागीकरण करणार्या किटकांवर किटकनाशकाचा परिणाम होत आहे. ते टाळण्यासाठी किटकनाशकाची फवारणी दुपारच्या सत्रात करावी.
तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यातील परागीकरण वाढविण्यासाठी मोहोर फुललेल्या अवस्थेत असताना सकाळच्या वेळेस ९ ते १२ वाजता झाडे हलवुन घ्यावीत. जेणेकरून टिकाऊ मोहोराला योग्य वेळेत फळाची धारणा होऊन उत्पादन चांगल्या दर्जाचे येईल. मोहोरातील सुकी फुले गळून पडली कि, मग कीड आणि झाडांवर रोगाचा परिणाम कमी होईल.
झाडांना पाणी घालताना सुद्धा विशिष्ट प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्याचप्रमाणे तीव्र सूर्य किरणांपासून फळांचा बचाव करण्यासाठी, त्याचप्रमाणे फळांवर डाग वगैरे पडू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते काही वेळा त्यावर आवरण घालून सुरक्षित ठेवावी लागतात.