शिमगा सणासाठी कोकणात जाण्यासाठी एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहन आणि कोकण रेल्वे हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी आगाऊ आरक्षण देखील केली, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढलेल्या गर्दीने प्रवासी हैराण झाले असून, आरक्षण असून देखील गाडीत बसण्यासाठी जागा न मिळाल्याने उभे राहून घरी जायची वेळ आली होती.
गुरुवारी मुंबईमधून रात्री धावलेली कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये तर एवढी गर्दी झालेली कि, ठाणे येथे थांबा असून देखील या ठिकाणी आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाडीत जागा मिळाली नाही अनेकांनी ही बाब कोकण रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडल वर पोस्ट देखील केली मात्र यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने चाकरमानी वर्गास उभ्यानेच प्रवास पार पाडावा लागला.
दरम्यान कोकणातील शिमग्यासाठी यावर्षी रेल्वेकडून गाड्यांचे नियोजन न करण्यात आल्याने कोकणात धावणाऱ्या ठराविक गाड्यांना मात्र गर्दी चांगलीच गर्दी झाली आहे. सलग ३ ते ५ दिवस सुरू असणाऱ्या कोकणातील शिमग्यासाठी जनतेकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी करत असताना मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याने परतीचा प्रवास देखील कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिमगा उत्सवासाठी कोकणात आलेले लाखो चाकरमानी परतत असून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या खचाखच भरून धावत आहेत. त्यामध्ये एसटीच्या संपामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाल्याने कोकण रेल्वेवर मोठा ताण पडला असून कोकण रेल्वेने प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांना प्रचंड गर्दी केल्याने जिल्ह्यातील रेल्वेस्थानके गर्दीने फुलून गेली आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.