जिल्ह्यातील वीजबिलाची थकबाकी पाहता, महावितरण आर्थिक संकटामध्ये असल्याचे निष्पन्न होत आहे. राज्यामध्ये हिंवाळ्यात विजेची मागणी कमी असते, परंतु मागील काही दिवसांपासून विजेची मागणी वाढली आहे. राज्यात विजेची मागणी असते, त्यावेळेला कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. साधारण उष्मा वाढल्याने सकाळी आणि संध्याकाळी विजेची चढी मागणी असते. त्याचवेळी ही वीजनिर्मिती केली जाते. पोफळी, अलोरे, कोळकेवाडी येथे कोयना प्रकल्पाचे वीजनिर्मितीचे एकूण चार टप्पे आहेत.
कोयना प्रकल्पातून महानिर्मितीने या एकूण प्रकल्पाच्या माध्यमातून मागील दोन दिवसांत आठ हजार मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती केली आहे. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालवण्याची ही तिसरी वेळ आहे. महानिर्मिती कंपनीने मागील दोन दिवसांत आठ हजार अतिरिक्त मेगावॉट वीजनिर्मिती केली आहे. कोयना प्रकल्पाने यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे कोयना प्रकल्प वीजनिर्मितीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वी राज्यात कोळसा टंचाईमुळे दोन वेळा थर्मल प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यावेळी कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती केली होती. धरणातील शिल्लक पाणी वापरण्याची परवानगी जलसंपदा विभागाने दिल्यामुळे तेव्हा कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती झाली होती. त्यानंतर आता पुन्हा या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती केली जात आहे.
कोयना धरण पायथागृहातून पश्चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याही पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. एकूण १९५६ मेगावॉट वीजनिर्मिती कोयना प्रकल्पातून केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात सध्या शेतीसाठी पाण्याची मागणी कमी आहे. त्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहातील १८ मेगावॉट क्षमतेचे एक मशिन बंद ठेवण्यात आले आहे. तरीही या प्रकल्पातून गेले दोन दिवस १९३८ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. महानिर्मिती कंपनीचे कोळशावर चालणारे परळी, खापरखेडा, भुसावळ, कोराडी, पारस, नाशिक येथे थर्मल वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत. त्या शिवाय सोलर आणि गॅस प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाते.