कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत २७३ मिमी पाऊस झाला आहे. कोयना धरणातील आवक कमी असली तरी पाणीसाठा ४५.१६ टीएमसीवर पोहोचला आहे. धरण अजून ५० टक्केही भरलेले नाही. जिल्ह्यात जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मागील आठवड्यातील पावसाची उघडझाप चिंता वाढवणारी होती. शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला.
कास, बामणोली, तापोळासह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झोडपले नंतर पावसाने विश्रांती घेतली होती; मात्र बुधवारपासून पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. कोयनानगर येथे ८ मिमी पाऊस झाला होता. १ जूनपासून आतापर्यंत १ हजार ९९० मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात २ हजार ३१९ मिमी पाऊस झाला. महाबळेश्वरला आतापर्यंत १ हजार ७६९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती.
त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आवकही कमी झाली होती. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढला आहे. कोयना येथे ८६ मिमी पाऊस झाला. नवजा येथे ११६ तर महाबळेश्वर येथे ७१ मिमी पाऊस झाला. गुरूवारी सकाळच्या सुमारास सुमारे २१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीसाठा ४५.१६ टीएमसी इतका झाला होता.