26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedकोयना प्रकल्पाला उदासीनतेचा फटका, कामेही रेंगाळली

कोयना प्रकल्पाला उदासीनतेचा फटका, कामेही रेंगाळली

स्थापत्य अभियंत्यांची पाच पदे मंजूर असताना केवळ तीन अधिकारी कार्यरत आहेत.,

कोयना प्रकल्पात सध्या अभियंत्यांचा दुष्काळ आहे. या प्रकल्पाच्या विविध विभागांमध्ये तब्बल ९९ पेक्षा जादा अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत, तर काही कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. शासनाच्या उदासीन कारभाराचा फटका कोयना प्रकल्पाला बसत आहे. कोयना धरणाची निर्मिती साडेसहा दशकांपूर्वी झाली. कोयना धरण हे केवळ दगड, सिमेंट, विटांची निर्जीव वास्तू नाही, तर अनेक कामगार, अभियंत्यांनी जीव ओतून, मराठी मातीचा चिवटपणा आणि जिद्दीने हा प्रकल्प उभारला. कोयना धरणावर अनेक प्रकल्प असल्याने, हा राज्यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प ठरला आहे. कोयनेच्या पाण्यामुळे ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन हरितक्रांती झाली आहे.

या प्रकल्पात दोन हजार मेगावॉट वीजनिर्मिती होत असल्याने, राज्य प्रकाशमान झाले. तांत्रिक अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातसुद्धा कोयना धरणाचा उल्लेख गुणवत्ता आणि दर्जाचे दुसरे प्रतीक, असा होतो. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या प्रकल्पाला बसत आहे. कोयना धरण प्रकल्पात अभियंत्यांच्या रिक्तपदांचे शतक झाले आहे. उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता असे महत्त्वाचे पद रिक्त आहेत. रिक्तपदांचा अतिरिक्त कार्यभार नेमणुकीवर असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडे कामांचा डोंगर होत असल्यामुळे कोणतेही काम वेळेवर होत नाही, अशी स्थिती आहे.

अलीकडेच कोयना प्रकल्पाचे रूपांतर सिंचन विभागात करून, सांगलीपर्यंतच्या सिंचनाची जबाबदारी या प्रकल्पावर सोपवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणाच्या व्यवस्थापनाची जवाबदारीही कोयना प्रकल्पाकडे देण्यात आली आहे. अल्प कर्मचारी वर्ग, अभियंत्यांची अपुरी संख्या यामुळे कोयनेतील अनेक प्रकल्प रखडले आहेत. कोयना सिंचन विभागातील अत्यंत महत्त्वाचे उपकार्यकारी अभियंता पद रिक्त आहे. उपविभागीय अभियंत्यांची सात पदे मंजूर असताना, केवळ तीन उपविभागीय अधिकारी कार्यरत आहेत.

कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्यांच्या ३८ मंजूर पदांपैकी २८ कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता कार्यरत आहेत. स्थापत्य अभियंत्यांची २८ पदे मंजूर असून, ही सर्व पदे रिक्त आहेत. प्रकल्पाच्या बांधकाम विभागाची अवस्थासुद्धा नाजूक आहे. बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, श्रेणी-२ अभियंता या २० मंजूर पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. स्थापत्य अभियंत्यांची पाच पदे मंजूर असताना केवळ तीन अधिकारी कार्यरत आहेत. विद्युत व यांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांची १५ पदे मंजूर असताना केवळ तीन पदे भरलेली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular