खेड तालुक्यातील मांडवे येथे एका बैलाच्या त्वचेवर लम्पी रोगसदृश लक्षणे आढळलेली. बैलाच्या स्वॅबच्या तीन नमुन्यांपैकी त्वचेचा नमुना यामध्ये पॉझिटिव्ह आला आहे; मात्र त्या बैलाची प्रकृती एकदम स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरीही पशुविभाग सतर्क झाला असून आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील जनावरांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.
मांडवे येथील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी रोगसदृश लक्षणे आढळल्याने या पार्श्वभूमीवर तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तत्काळ बैलांचे रक्त नमुने, नोझल नमुने आणि त्वचेचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, रक्त आणि नोझलचे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आलेत; तर त्वचेचा स्वॅब मात्र पॉझिटिव्ह आला आहे.
शेतकऱ्याने त्वचेवरील या आजाराची लक्षणे दिसून येताच, त्याच दिवशी त्या बैलाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्याच्यावर वेळीच औषधोपचार करायला सुरूवात केली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली नसून उत्तम आहे. सद्यस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून मांडवे पंचक्रोशीपासून आजूबाजूच्या पाच किमीच्या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यावर पशुविभागाने भर दिला आहे, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी दिली.
तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेऊन पंचक्रोशीतील सर्व गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करणे, फवारणी करणे, लसीकरण करणे अशा विविध बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना पशुसंवर्धन विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेक उपाययोजना या निशुल्क असल्याने शेतकऱ्यांनी त्याची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पशु अधिकाऱ्यांनी केले आहे. जेणेकरून हि साथ फैलावणार नाही, आणि जनावरांची प्रकृती ठीक राहील.