तालुक्यातील असोंड गावच्या तरुणासह रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ते थोडक्यात बचावले असून बिबट्याच्या नखांमुळे तरुणाला जखमा झाल्या आहेत. दापोली येथून असोंडला जात असताना रात्री सव्वाआठच्या दरम्यान ही घटना घडली. वैभव खेडेकर (वय २५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. आतापर्यंत त्या बिबट्याने ४ जणांवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. वैभव खेडेकर हा तरुण ७ ऑक्टोबरला दापोलीकडून दुचाकीवर गावी येत होता. दुचाकीवर मागे त्याचा मित्र अजय खेडेकर बसला होता.
अजयच्या हातात मासळीची पिशवी होती. ओमतेलोबा मंदिर परिसरात आल्यावर रस्त्याशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर उडी घेतली. मासळीची पिशवी बिबट्याने ओढून नेली. यावेळी पंजा मारला तो वैभवच्या पायावर बसला. त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. वैभवने बिबट्याच्या हल्ल्यात न डगमगता हातातील दुचाकी सोडली नाही, तर त्याने शिवाजीनगर येथील खासगी डॉक्टराकडे जाऊन उपचार करून घेतले. ही घटना समजताच वनविभागाच्या वन अधिकारी प्रकाश पाटील यांनी वैभवची भेट घेऊन विचारपूस केली.
त्याचप्रमाणे ज्या परिसरात घटना घडली त्या परिसरात गस्त चालू केली. बिबट्यापासून बचावासाठी परिसरात सूचना फलक लावणार असल्याने त्यांनी सांगितले. संध्याकाळी पावणेसातच्या दरम्यान मंगेश घडवले (वय ३५) या आणखी एका तरुणावर बिबट्याने याच परिसरात हल्ला केला, पण तो बचावला. त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटखाली बिबट्याची नखे लागली आहेत. गेल्यावर्षी याच रस्त्यावर ३ ते ४ जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. गेले वर्षभर बिबट्या कोणालाही दिसला नाही.
त्यामुळे तो या परिसरातून दुसरीकडे निघून गेल्याची चर्चा होती, मात्र आता परत बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा बँकेच्या गावतळे शाखेच्या एका कर्मचाऱ्यावरही या बिबटयाने हल्ला केल्याचे समोर येत असून गेले दोन ते तीन दिवसात या बिबट्याने परिसरातील चौघांवर हल्ला केल्याची घटना समोर येत आहे. यामुळे घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त वनखात्याने त्वरित करावा अशी मागणी जोर धरत आहे.