32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...
HomeDapoliवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे, रुग्णालय मोजतय शेवटच्या घटका

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे, रुग्णालय मोजतय शेवटच्या घटका

दापोली उपजिल्हा रुग्णालयात ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असुन यातील केवळ वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भागवत हे एकमेवच रुग्णालयाचा भार वाहताना दिसत आहेत.

दापोली उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस बिकटच बनत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालयालाच घरघर लागली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत हे एकच कायमस्वरूपी डॉक्टर म्हणून कार्यभार पाहत आहेत. दापोली तालुक्‍यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील ग्रामीण भागाबरोबरच खेड व मंडणगड तालुक्‍यातील रुग्णही औषधोपचारासाठी येतात.

मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या उपजिल्हा रुग्णालयाचीच प्रकृती ढासळू लागली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असुन यातील केवळ वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भागवत हे एकमेवच रुग्णालयाचा भार वाहताना दिसत आहेत. या उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बालाजी सगरे (स्त्रीरोग तज्ञ) यांच्या सेवा अन्य रुग्णालयात वर्ग करण्यात आल्या आहेत, तर डॉ. मोमीन हे अनेक महिन्यांपासून गैरहजर आहेत. डॉ. सुरेश कुऱ्याडे (कंत्राटी अस्थिरोगतज्ज्ञ) आयुष विभागातील डॉ. प्रदीप बनसोडे हे कंत्राटी स्वरूपात सेवा देत आहेत. डॉ. महेश भागवत, डॉ. सुरेश कुऱ्याडे, डॉ. प्रदिप बनसोडे या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अपघातातील रुग्णांवर उपचार करणे, ओपीडीमधील रुग्ण तपासणे, शवविच्छेदन करणे आदी कामांचा प्रचंड ताण पडतो. वैद्यकीय अधिकाऱ्यां अभावी संध्याकाळची ओपीडी बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याचा त्रास लांबून ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना सहन करावा लागतो आहे. दापोली बरोबरच खेड, मंडणगड तालुक्‍यातील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्ण तपासायचे की शवविच्छेदन करायचे हा प्रश्‍न वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सोडले तर सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत.

८ वर्षांपूर्वीच या रुग्णालयाची श्रेणीवाढ करून या रुग्णालयाला १०० खाटांची परवानगी देण्यात आलेली, परंतु, अद्याप या रुग्णालयाचा कार्यविस्तार होऊ शकलेला नाही. दापोली उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे दापोली येथील गरीब जनतेचे अतोनात हाल आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular