यंदा मान्सून अजून हवा तसा महाराष्ट्रामध्ये स्थिरावलेला नाही, अर्धा जून संपत आला, तरी अद्यापही हेच चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वातावरण ढगाळ होऊन पावसाची शक्यता असल्याचे दिसते, सोबत सोसाट्याचा वाराही सुटत आहे, पावसासाठी पूरक वातावरणही तयार असून पावसाच्या सरी मात्र काही बरसत नाहीत. थोडक्यात काय, तर यंदाचा मान्सून वेळेवर हजार झाला असला तरी, अजून त्याला वेग प्राप्त न झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे. पण, पावसाचं प्रमाण मात्र कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी समजला जातो. यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन व सरासरीच्या १०० टक्के पर्जन्यमान होणार असल्याचे भाकीत हवामान वेधशाळेने वर्तवले होते. सध्या मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत असल्याचे वेधशाळेकडून जाहीर करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात पाऊस होत नाही.
येत्या २ दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवली आहे. एकिकडे पावसानं तग धरलेला नसतानाच पाऊस स्थिरावल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर इथं तो ११ जून रोजीच पोहोचला आहे. पण, अद्यापही मान्सूनची पकड मात्र पक्की नसल्याचं लक्षात येत आहे.
तालुक्यात काही प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस झाला. नंतर पावसाने दडी मारली. मान्सूनच्या आगमनासाठी अजून काही दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता दिसत आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसलेला आहे.