शासनातर्फे दर पाच वर्षांनी केली जाणारी २१ वी पशुगणना लवकरच केली जाणार आहे. या पशुगणनेच्या माध्यमातून पशुधनाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. या पशुगणनेमध्ये गाय, म्हैस, शेळ्या, कोंबड्या यांच्यासह अन्य पशुधनाची पशुपालकांच्या घरोघरी जाऊन ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरील अॅपद्वारे गणना केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या पशुगणनेसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅपमध्ये काही तांत्रिक त्रुटी दिसत असल्याचे प्रायोगिक तत्त्वावर काही राज्यांमध्ये करण्यात आलेल्या पशुगणनेच्यावेळी स्पष्ट झाले. अॅपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने पशुगणना करण्यामध्ये अडचणी येत असल्याने १ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही पशुगणना ऑक्टोबर ! महिन्यापर्यंत लांबणीवर पडली.
कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जात असलेल्या भारतामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने शेती करताना पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे जोडव्यवसाय करून त्याद्वारे शेतकरी आर्थिक प्रगती साधत आहेत. शेतीला जोडव्यवसाय देण्याच्या उद्देशातून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची जनावरे पाळली जात आहेत. या जनावरांची दर पाच वर्षांनी शासनातर्फे पशुगणना केली जाते. यापूर्वी २०१९ मध्ये पशुगणना झाली होती. यावर्षीच्या गणनेसाठी पशुपसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षित प्रगणकांची नियुक्तीही केली आहे.