कोकण रेल्वेमार्गावर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरीत लोहमार्ग पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे. या पोलिस ठाण्यात १४० पोलिसांचा ताफा दिमतीला असणार आहे. लोहमार्ग पोलिस ठाण्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. कोकण रेल्वेगाड्यांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. याशिवाय चोऱ्यांसह विनयभंगाच्या तक्रारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तातडीने नोंदवणे शक्य होणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेत नवी भर पडणार आहे. रोहा रेल्वेस्थानकापासून कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. या हद्दीतील प्रवाशांच्या सुरक्षेसह गुन्ह्यांच्या तपासाची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे सुरक्षादलावर आहे. कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने लंपास करण्यासह त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.
रेल्वेडब्यातील आरक्षित आसनांवरील प्रवाशांचे चोरट्यांकडून मोबाईलही हातोहात लांबवले जात आहेत. या साऱ्या गुन्ह्यांची तक्रार बऱ्याचवेळा मुंबईत आल्यानंतरच संबंधित प्रवाशांना करावी लागते. रेल्वे सुरक्षादल स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिस करतात. तक्रारी देण्यास होणाऱ्या विलंबामुळे गुन्ह्याचा छडाच लागत नाही. विनयभंग, छेडछाड व हाणामारीच्या तक्रारीही लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर येतात; रेल्वे सुरक्षादलाशी संपर्क साधत कारवाई करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागत होते. कोकण मार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी रोहा, कणकवली, रत्नागिरी या तीन स्थानकांवर लोहमार्ग पोलिस स्थानकांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता.
दिवसरात्र ड्यूटी बजावणार – कोकण मार्गावर वाढत्या गुन्हेगारीसह चोऱ्या रोखण्यास मदत होणार आहे. दरोडे, विनयभंग यांसह कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यास तातडीने कार्यवाही करण्याची प्रक्रियाही जलदगतीने होणार असल्याने गुन्ह्यांचा उलगडा तातडीने होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित होणार आहे. या लोहमार्ग पोलिस ठाण्यात १४० पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे.