मागील दोन ते अडीच महिन्यापासून, राज्यात घडून आलेले राजकीय बदल लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. शिवसेनेतील ४० आमदार, खासदार यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे, सर्वच राजकारणामध्ये उलथापालथ झाली. त्यानंतर संपन्न होणारा दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामध्ये दोन्ही गटाचा दसरा मेळावा संपन्न झाला असून, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. राजकीय गटाच्या चिन्हांचे राजकारण घडले, आणि निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी मशाल आणि ढाल तलवारीचे चिन्ह मिळाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज बुलंद करणारे आणि मनमनात अंगार फुलवणारे नवीन चिन्ह असलेले मशाल गीत संगीतबद्ध झाले असून या गीताचा नादघोष आता अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुंजणार आहे. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आज संगीतकार राहुल रानडे यांनी हे गीत सुपूर्द केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘मशाल’ ही निवडणूक निशाणी दिली आहे.
ही निशाणी क्षणार्धात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली असून हाती धगधगती मशाल घेऊन एकनिष्ठ शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता पुढच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. या लढाईत अंगार फुलवण्याचे काम आता मशाल गीत करणार आहे.
शंखनाद होऊ दे, रणदुदुंभी वाजू दे, नादघोष गर्जू दे विशाल, दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, धगधगती पेटू दे मशाल।। असा ‘शंखनाद’ मशाल गीतातून होणार असून प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले आहे.
विवेक नाईक यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायले असून प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी या गीताला संगीतसाज चढवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आज हे गीत सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.