जिल्ह्यातील वीजग्राहकांना अखंडित विद्युतपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध अपघातांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नऊ तर जखमींमध्ये १७ जणांच्या अपघाताला महावितरण जबाबदार असल्याचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. महावितरण कंपनीने ही माहिती दिली आहे. या आकडेवारीमुळे महावितरणच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करताना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि दुखापती होणे चिंताजनक आहे. विशेषतः कंपनीच्याच चौकशी अहवालात त्यांच्या जबाबदारीची कबुली दिल्याने या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. यामध्ये जुन्या आणि धोकादायक विद्युतखांब, तारांची दुरुस्ती, योग्य इन्सुलेशन आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता उपाययोजनांचा प्रशिक्षणसारख्या समावेश असणे आवश्यक आहे.
महावितरण कंपनीने २०२२ मध्ये विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये १४ जणांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये ५ अपघातांमध्ये कंपनीचा दोष असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२३ मध्ये ९ जणांचा जीव गेला. त्यामध्ये एका अपघातात कंपनीचा दोष आहे. २०२४ मध्ये ७ जणांचा जीव गेला. त्यामध्ये एकाचा मृत्यू महावितरणच्या चुकीमुळे झाला आहे. २०२५ मध्ये ६ जणांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला असून, २ जणांच्या मृत्यूला महावितरण दोषी आहे तर २०२५-२६ मध्ये अपघातांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मात्र महावितरण कंपनीची कोणतीही चूक नसल्याचे अहवालात म्हटले आहे तर याच काळामध्ये विविध अपघातांमध्ये ४० जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये जखमींपैकी १७ जणांचे अपघात हे थेट महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. महावितरणने ही अधिकृत माहिती दिली.