शासनाने लोकसंख्येच्या आधारे राज्यातील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरीत दोन जागा वाढणार आहे. रत्नागिरी पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ३० वरून ३२ होणार आहे. ४० हजार लोकसंख्येला २५ नगरसेवक व त्यावरील प्रत्येकी ५ हजार लोकसंख्येमागे १ नगरसेवक वाढणार आहे; परंतु गेली तीन वर्षे पालिकेवर प्रशासन आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत इच्छुकांना मोठी कसरत करत शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे. शहरात वर्चस्व असलेल्या शिवसेनेत फूट पडल्याने महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे; परंतु इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी आणि फोडाफोडी-पाडापाडीच्या राजकारणाला ऊत येणार हे नक्की. राज्याच्या नगरविकास विभागाने लोकसंख्येच्या तुलनेत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब वर्ग दर्जाच्या रत्नागिरी आणि चिपळूण या दोन पालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.
ब वर्ग दर्जाच्या पालिकेमध्ये ४० हजार लोकसंख्येपर्यंत २५ नगरसेवक असतील तर त्यापुढील प्रत्येकी ५ हजार लोकसंख्येमागे १ नगरसेवक वाढणार आहे; मात्र नगरसेवकांची कमाल संख्या ३७ ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेचा विचार करता २०११च्या जनगणनेनुसार, शहरातील लोकसंख्या ७६ हजार २२९ इतकी आहे. पहिल्या ४० हजारासाठी २५ नगरसेवक निश्चित असणार आहेत. त्यापुढे प्रत्येकी ५ हजार लोकसंख्येला १ नगरसेवक वाढणार आहे. हे लक्षात घेता रत्नागिरी पालिकेमध्ये आणखी २ नगरसेवक वाढणार आहेत. सध्या पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ३० आहे ती आता ३२ होणार आहे. २०२२ला केलेल्या प्रभाग रचनेप्रमाणे या निवडणुकीची प्रभाग रचना राहणार आहे. राजकीय स्थितीचा विचार करता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी ६ प्रभाग हे ठरलेले आहेत. त्या प्रभागांमध्ये या दोन्ही पक्षांचे उमेदवार हमखास निवडून येतात तर उर्वरित प्रभागांमध्ये पूर्वीच्या
शिवसेनेचे वर्चस्व कायम होते. प्रत्येक माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी गेली वर्ष ते दोन वर्षांपासून आपला प्रभाग बांधून ठेवण्यासाठी संपर्क कायम ठेवला आहे. दोन भाग झालेल्या शिवसेनेमध्ये वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच होणार, यात शंकाच नाही; परंतु केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेना विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे; परंतु पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यापासून महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी मात्र नजरेत भरण्याएवढे दिसत नाहीत. एखाद दुसरे आंदोलन किंवा शहराचा प्रश्न उचलून धरला तर त्यामध्ये मनसे किंवा उबाठा सेना असे दिसते. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी दिसते; पण त्यांच्यातही फूट पडली आहे; परंतु काँग्रेस कुठेच दिसत नाही. निवडणुका अजून लांब असल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे, तो जागावाटपाचा.
प्रभाग क्र. ५ फोडून नवा वॉर्ड – प्रभाग क्र. ५ फोडून हा नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. साळवी स्टॉप, त्या परिसरातील झोपडपट्टी, असा भाग धरून हा नवीन वॉर्ड झाला आहे. या प्रभागातदेखील जोरदार लढती पाहायला मिळणार आहेत