शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक प्रकारची प्रतिभाशाली मुले आहेत. परंतु त्यांना दिशा न मिळाल्याने काहीशी पाठी राहतात. फक्त शिक्षण एके शिक्षण असा विचार न करता अनेक तरुणांमध्ये विविध खेळ, नृत्य, संगीत अशा अनेक प्रकारामध्ये कलागुण अंगीकृत असतात. गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शन आणि प्लाटफॉर्मची.
आपल्या आजूबाजूला अनेक सत्यतेवर आधारित विपरीत घटना घडत असतात. पण त्याला प्रत्यक्ष वाचा फोडण्याची हिम्मत मात्र कोणी करत नाही. परंतु, शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मंडणगडमधील तरूणांनी समाजातील अघोरी प्रथा, अंधश्रद्धेवर शिक्षणाच्या माध्यमातून भाष्य करणार्या झुंजुमुंजुची निर्मिती केली आहे. या शॉर्टफिल्मला भारत इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल, शिमला इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म म्हणून झुंजुमुंजुची निवड केली आहे. तसेच भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झुंजुमुंजुतील बालकलाकार रितेश हंबीर याला सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टीव्हलमध्ये आपला ठसा उमटवणार्या मंडणगडच्या झुंजुमुंजूने सर्वोत्कृष्ट लघुपटासह उत्कृष्ट बालकलाकार, लेखक, कॉन्सेप्ट अशा विविध सात पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. तसेच अन्य पाच फिल्म फेस्टीव्हलमध्ये त्याची निवड केली. ही बाब मंडणगडच्या कलाविश्वासाठी अत्यंत गौरवास्पद असून झुंजुमुंजु पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मात्र फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याने अजून काही काळ प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे टीमकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल झुंजुमुंजू शॉर्टफिल्म टीमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सात विविध विभागात मिळालेले पुरस्कार सर्व रत्नागिरीकरांसाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे.