रत्नागिरी जिल्हातील शेवटच टोक असेलेला तालुका म्हणजे मंडणगड. पावसाळ्यामध्ये कोकणच्या सौन्दर्यामध्ये चांगलीच भर पडत असते. सगळीकडे पसरलेला हिरवा शालू आणि त्यामधून वाहणारा सफेद दुधासारखा फेसाळ धबधबा असे वर्णन ऐकून सुद्धा मनातून आपण त्या जागी जाऊन पोहोचतो सुद्धा. पर्यटनाची आवड असणार्यांसाठी पावसाळ्यातील कोकण भ्रमंती म्हणजे एक पर्वणीच आहे.
कोकणामध्ये अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना भुरळ घालतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी न चुकता पर्यटक त्या ठिकाणी भेट देतातच. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामध्ये बहरलेल्या निर्सगाचे नयनरम्य देखेणे रूप पहायला अनेक पर्यटक येत असतात. त्यामध्येच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला मंडणगड किल्ला लोकांना पावसाळ्यामध्ये विशेष आकर्षित करत आहे.
स्थानिक सकाळी अथवा संध्याकाळी किल्यावर वॉकसाठी जातात. तर अनेक पर्यटक येणाऱ्या विकेंड सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी किल्याची भ्रमंती करायला मंडणगडमध्ये दाखल होतात. पहाटेच्या धुक्याचा आनंद घेत, किल्यावर जाण्यासाठी असणारा डांबरी रोड त्यामुळे चालत जाण्यासाठी विशेष काही अडचणी येत नाहीत. किल्यावरील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी, तलाव यांमध्ये पोहोण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. मंडणगड किल्ल्याच्या आणि परिसराच्या सौंदर्याला भुलून अनेक जण आपला विकेंड किल्यावर व्यतीत करतात.
ऋतूनुसार पर्यावरणामध्ये होत जाणार्या बदलांचे अविस्मरणीय क्षण आठवणीमध्ये साठवून ठेवण्यासाठी सध्या सर्वांचा साथी असलेला कॅमेरा सोबत असतोच. त्यामुळे अनेक क्षण मोबाईल किंवा कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवतात. काही कुटुंबे किंवा ग्रुप सुद्धा नाईट स्टे साठी किल्यावर पसंती दर्शवतात. परंतु, शासनाचे या पुरातन वास्तूकडे दुर्लक्ष होत असून, पुरेशा सोयी सुविधांची कमतरता तिथे जाणवत आहे. त्यामुळे विविध अत्याधुनिक बाबींचा जर तिथे समावेश केला तर, पर्यटक सुद्धा आकर्षित होतील आणि महसूल वाढण्यास सुद्धा मदत होईल.