रत्नागिरी तालुक्यामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ठराविक काळामध्ये पिकांची योग्य काळजी घेतली तर उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे घेता येते. परंतु सतत बदलणारे वातावरण, उन्हाचा कहर, अतिवृष्टी यामुळे सर्वच पिक झाडांवर दुष्परिणाम दिसून येतात.
कातळ भागात वाढलेल्या तापमानामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून, त्याचा विमा परतावा अद्याप मिळालेला नाही. मुख्य म्हणजे कातळ भागातील तापमान नोंदीसाठी तापमापकच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अनेक ठिकाणी डोंगर पायथ्याशी, किनारी भागात तापमापक असल्याने तेथील कमाल तापमान आणि कातळावरील तापमान यामध्ये खुपच फारकत आढळते, असे नावले यांनी सांगितले. सदस्य नावले यांनी आंबा बागायतदारांच्या वतीने व्यथा मांडली.
मागील काही काळामध्ये कातळावर असलेल्या बागायतीमध्ये कमाल तापमान असल्याने मोठ्या प्रमाणात आंबा नुकसान झाले. विमा निकषात ३७.५ अंश सेल्सिअस वर पारा गेला तरच विमा परतावा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे विमा कंपन्यानी याची दखल घेणे गरजेचे आहे. सभमध्ये उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपन्या तापमापक बसवत असल्याचे उत्तर दिले. योग्य नोंदी झाल्याशिवाय त्याचा योग्य लाभ बागायतदारांना मिळू शकत नाही. अन्यथा बागायतदार फक्त नियमित विमा हप्ते भरत राहतील आणि नुकसान सहन करून परतावा शून्य अशी स्थिती होईल.
पुढे विषय मांडण्यात आला कि, विमा कंपनी कडून आंबा पिक कमाल तापमानाची नोंद योग्य पद्धतीने केली जात नसल्याने त्याचा फटका कातळावरील आंबा बागायतदारांना बसतो. तरी कृषी विभाग आणि विमा कंपनी यांनी दखल घेऊन यावर उपाय काढावा, असा मुद्दा पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सदस्य सुनील नावले यांनी उचलून धरला. सभापती संजना माने यांनी विमा कंपनी प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे आणि संबंधित विमा कंपनी प्रतिनिधींशी बैठक घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.