वातावरणामध्ये सततच्या होणाऱ्या बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा मंजूर झाल्याने एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बागायतदारांसाठी ५३ कोटी ३५ लाख ९० हजार ७१८ रुपयांचा परतावा मंजूर झाला असून, एकूण १४ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावरील बागांचा विमा उतरवण्यात आला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात परतावा मंजूर झाला आहे.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड या विभागात प्रामुख्याने आंबा, काजू ची लागवड झाली आहे. गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पाऊस, वेगवान वारे आणि गारपीट, पूर, अतिवृष्टी यामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. या संकटांचा किनारी भागातील बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामधून शेतक-यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून दिलासा देण्यासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे.
स्थानिक स्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्यात येत असतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण २४ हजार ६४४ शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला आहे. त्यामध्ये काजू बागायतदारांची संख्या ३ हजार २९३ एवढी आहे, तर आंबा बागायतदारांची संख्या २१ हजार ३५१ एवढी आहे. त्यात आंब्यासाठी ५० कोटी ७६ लाख रुपये तर काजूचे २ कोटी ५९ लाखाचा परतावा आहे. मागच्या वर्षी जिल्ह्याला विक्रमी असा ८४ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला होता. मात्र यंदा शेतकऱ्यांचा हप्ता वाढूनही परतावा त्या तुलनेत कमीच म्हणजे पन्नास टक्केच मिळाला आहे.
विमा उतरवण्याचा कालावधी डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात आला होता. म्हणून जानेवारी पासून होणाऱ्या बदलांवर आधारित विमा रक्कम अदा करण्यात येणार आहे. परंतु, सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हैदोस घातला. अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती झाली. सध्या विमा कंपनीकडून परतावा मंजूर झाला असून, केंद्र व राज्य शासनाकडून हप्त्यापोटीची रक्कम विमा कंपनीकडे अद्याप जमा झालेली नसल्याने, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष परताव्याची रक्कम जमा होण्यासाठी किती कालावधी लागणार हे सध्या सांगू शकत नाही.