राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने, कोरोना निर्बंधातून मुक्तता कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांमुळे राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता, अनेक राज्ये कोरानामुक्त करण्याचे शासनाने संकेत दिले आहेत.
आजपासून कोरोना प्रभाव ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. त्याचप्रमाणे, राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण ज्या जिल्ह्यांमध्ये झालेले आहे, त्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. आणि जे नियम उपाहारगृहे, चित्रपट व नाटय़गृहे आदीना ५०% क्षमतेचे लागू करण्यात आले होते ते, पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाणार आहे.
राज्यात यापूर्वी १ फेब्रुवारीपासून सर्व पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, हॉटेल, राष्ट्रीय उद्याने, सफारी, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी दोनशे तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध पूर्ण रद्द करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात ब्युटी पार्लर, सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे निम्म्या म्हणजेच ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांतील लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने तेथील निर्बंध मागे घेण्यात येतील. मात्र एखाद्या जिल्ह्यात अजूनही अधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असतील तर, तेथे कोरोना निर्बंध लागू ठेवण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास देण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे लवकरच राज्य कोरोनामुक्तीकडे वळणार असल्याचे शुभ संकेत दिसून येत आहेत.