रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे वरची गुळेकर वाडी येथील मनिषा मंगेश वारीशे या महिलेला खोट सांगून दुचाकीवरुन फसवून नेताना झालेल्या झटापटीत दुचाकीवरून पडून महिलेच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापातीमध्ये मृत्यू झाल्याप्रकरणी संशयित दिवाकर सुधाकर शिंदे याला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र न्यायालयाने पुन्हा त्याचा जामीन नाकारुन नव्वद दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे .
माघी गणेशोत्सव निमित्ताने सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान गणेश मंदिरातील दर्शनानंतर घरी परतत असताना वाटेत वाडीतील दिवाकर सुधाकर शिंदे याने मनात महिलेबद्दल वाईट हेतू ठेवून तिच्यापाशी येऊन ‘तुझी आई आजारी आहे, चल तुला माहेरी सोडतो’ असे कारण सांगून गाडीवर बसण्यास सांगितले. परंतु, माहेरचा भाग पाठीमागे निघून गेला तरी दुचाकी न थांबवल्याने महिलेला संशय आला आणि महिलेने दिवाकर सुधाकर शिंदे याला गाडी थांबवण्यास सांगितले, परंतु त्याने गाडी न थांबवल्याने झालेल्या झटापटीत ती महिला गाडीवरून पडली, त्यात तिचा मृत्यू ओढवला. तो तिला तिथेच रस्त्याच्या कडेला सोडून पळून गेला.
गावातील काही लोकांनी हि घटना पहिली होती, त्यामुळे या संदर्भात पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी वेगाने तपास यंत्रणा कामाला लावली. अखेर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने तपास कार्य सुरु झाल्यानंतर या महिलेच्या मृत्यू प्रकरणी संशयित म्हणून दिवाकर शिंदे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्या नंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी आरोपीला पंधरा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्याला पुन्हा नव्वद दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.