छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकून शत्रूचादेखील थरकाप व्हायचा. छत्रपती संभाजीराजे म्हणजे अतुलनीय धाडस, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक ! अशा राजाच्या स्मारकाच्या दुर्दैवाचे फेरे संपत नाहीत, ही इतिहासापेक्षा वास्तवातील मोठी शोकांतिका आहे. राजांना संगमेश्वरच्या भूमीत दगाबाजीने बेसावध असताना शत्रूने पकडले. या भूमीवर हा दुर्दैवी डाग कायम असताना आता त्यांच्या स्मारक दुरवस्थेमुळे छत्रपती संभाजीराजे प्रेमींसह पर्यटकांनीदेखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीराजे स्मारक समिती या भव्यदिव्य योजनेत पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. ११ मार्च १९८९ रोजी भूमिपूजन झालेले संगमेश्वर येथील महाराजांचे स्मारक आज ४० वर्षांनीही अपूर्णच आहे. इतिहासातील काही गोष्टी जशा शापित आहेत, तसेच या स्मारकाच्या बाबतीत घडणार आहे, याची छत्रपती संभाजीराजे प्रेमींना काय कल्पना?
स्मारकाच्या उभारणीची सुरुवात जोमाने झाली; मात्र त्यानंतर सुरू झालेले स्मारकाच्या दुर्दैवाचे फेरे आज ४० वर्षांत ८० लाख रुपये खर्च होऊनही कायम आहेत. हे स्मारक पूर्ण होऊन कार्यरत होण्यासाठी अनेक आंदोलने, विनंत्या आणि बैठका घेण्यात आल्या. अनेक संघटना आणि मान्यवरांनी भेटी देऊन गर्भित इशारेही दिले; मात्र यातील एकाही चळवळीचा परिणाम कोणावर झालेला नाही. बांधकाम विभागाने निकृष्ट पद्धतीने काम झालेले स्मारक हस्तांतरित करून पुढील जबाबदारी स्मारक समितीवर सोपवली. स्मारक समितीकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने हे स्मारक गेल्या दहा वर्षांत कार्यरत होऊ शकलेले नाही.
स्वखर्चाने अनेकदा साफसफाई – छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. व्यक्तीशः या स्मारकाची स्वखचनि अनेकदा साफसफाई केली; मात्र स्मारक हे समितीच्या ताब्यात असल्याने देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. समितीच्या दुर्लक्षामुळे स्मारकाची दुरवस्था झाली आहे. ही इमारत सरकारजमा करावी, अशी मागणी पर्शुराम पवार यांनी केली आहे.