सावंतवाडी, वैभववाडीसह जिल्ह्याच्या अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. दिवाळीवर पावसाचे सावट कायम असून हवामान विभागाने शुक्रवार (ता. २४) पर्यत यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे हजारो भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी (ता.२०) सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री विजांच्या लखलखाटांसह पावसाच्या सरी बरसत होत्या. काही भागात पहाटे देखील पाऊस झाला. त्यानंतर आज सकाळी कडक उन्ह पडले होते. ऑक्टोबर हिटच्या झळा बसत होत्या. परंतु, त्यानंतर पुन्हा वातावरण बदलले. सायकांळी तीन वाजल्यापासून सावंतवाडी, बांदा परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भातपिक कापणी केलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, वैभववाडी, कणकवली तालुक्याच्या काही भागात हलक्या सरी झाल्या.
या पावसामुळे भातपिकांच्या कापणीत अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ५४ हजार हेक्टरपैकी १५ हजार हेक्टरवरील भातपिकांची कापणी पूर्ण झाली आहे. परंतु, अजुनही ४० हजार हेक्टरवरील पिकांची कापणी शिल्लक आहे. भात कापणी केली तरी अडचणीत आणि नाही केली तरी अडचणीत, अशा व्दिधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. दरम्यान, पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने २४ पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे.
…अन्यथा नुकसान – जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भातपिकांपैकी १५ हजार हेक्टरवरील पिकाची तातडीने कापणी होणे आवश्यक आहे. या पिकांची कापणी पुढील चार पाच दिवसांत झाली नाही तर पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

