रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात घुसून बेसुमार मासेमारी करणाऱ्या कर्नाटकमधील मलपी येथील नौकांना रोखण्यासाठी समुद्रात गेलेल्या मत्स्य विभागाच्या नौकेला खोल समुद्रात परप्रांतीय नौकांनी घेरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचान्यांच्या धाडसामुळे परप्रांतिय मच्छिमारांचा मनसुबा धुळीस मिळाला. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मत्स्य विभागाने एक नौका पकडून मिरकरवाडा बंदरात आणली. खोल समुद्रात हा सारा बरार पडला. जिवाची बाजी लावून मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १० ते १२ नौकांना पळवून लावले. कोकण किनारपट्टीवर सध्या परप्रांतीय मच्छिमारांनी धुडगुस घातला आहे. भले मोठे ट्रॉलर कोकणच्या सागरी हद्दीत घुसून बेसुमार मासेमारी करत आहेत. स्थानिक मच्छिमारांनी विरोध केल्यानंतर या मच्छिमारांवर परप्रांतिय मासेमारी नौकांवरुन समुद्रात दगडफेक व हल्ले होत आहेत. बुधवारी रात्री असाच एक प्रकार घडला आणि मत्स्य विभागाने परप्रांतिय मच्छिमारांचे कंबरडेच मोडून काढले.
मलपीतील नौका घुसल्या – बुधवारी रात्री पावस-गोळप समुद्रात रात्री ११ ते ११.३० वा.च्या सुमारास ३५ ते ४० हायस्पीड परप्रांतिय ट्रॉलर मासेमारीकरीता घुसले होते. याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाला दिली. एकाचवेळी ३५ ते ४० ट्रॉलर घुसल्याने मत्स्य विभागाने कारवाईसाठी पथक पाचारण केले.
गस्ती नौका घटनास्थळाकडे – परप्रांतिय मासेमारी नौका आपल्या हद्दीत घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्य विभागाचे एक पथक गस्ती नौका घेऊन पावसच्या दिशेनें रवाना झाली. गस्ती नौका आल्याचे पाहून या नौकेवर परप्रांतिय मच्छिमारांनी हल्ला चढवला.
स्थानिक मच्छिमार धावले – अचानक गस्तीनौकेवर हल्ला झाल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. तात्काळ सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी स्थानिक मच्छिमारांशी संपर्क साधून गस्ती नौकेतील कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्थानिक मच्छिमार गस्ती ‘नौकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावले.
नौका घेरली – मत्स्य विभागाचे कर्मचारी जी गस्ती नौका घेऊन गेले होते त्या नौकेलाच ३५ ते ४० परप्रांतिय ट्रॉलरनी घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच बोटीतून काही वस्तू गस्ती नौकेवर फेकण्यात आल्याचे समजते. हा थरार सुरू असतानाच अचानक स्थानिक मच्छिमारांच्या नौका त्याठिकाणी दाखल झाल्या.
पोलीस कुमक बोट घेऊन रवाना – समुद्रात रात्रीच्यावेळी महाभयंकर राडा झाला होता. याची माहिती तात्काळ पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिसांचे जादा बळ मिरकरवाडा येथील नौकेवरुन पाठवण्यात आले. तोपर्यंत स्थानिक मच्छिमारांच्या १० ते १२ नौका बोटींचा ताफा मदतीसाठी पोहोचला होता.
गस्तीनौकेचे इंजिन बंद – मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्तीनौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली. गस्ती नौका बंद पडल्यांमुळे इतरत्र नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता. मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे मोठा प्रसंग टळला.
एक नौका पकडली – यावेळी मत्स्य विभागाने पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने एक नौका समुद्रात पकडली. ही नौका मिरकरवाडा बंदरात रात्री उशिरा आणण्यात आली. या नौकेवरील खलाशांनादेखील मत्स्य विभागाने ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल होणार – पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. सदरच्या नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.