रत्नागिरीमध्ये मागील वर्षांपासून आलेली अनेक नैसर्गिक संकटे पाहता, रत्नागिरीमध्ये भारतीय हवामान खात्याने दीर्घ पल्ल्याची पल्स डॉपलर वेदर रडारची स्थापना करण्याचे घोषित करण्यात आले होते, परंतु, वादळे, महापूर, अतिवृष्टी इत्यादी संकटांनी रत्नागिरी कोकण किनारपट्टीची दैना लागली तरीही, अद्याप त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.
रत्नागिरीचे अभ्यासू माजी नगराध्यक्ष आणि सद्य नगरसेवक मिलिंद कीर यांनी या संदर्भातील भूगर्भशास्त्र मंत्रालयाला पत्र लिहले आहे. सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे अशा प्रकारची आपत्ती मोठ्या प्रमाणात उदभवत आहेत. त्यामुळे जर संभाव्य धोक्याची कल्पना काही काळ आधी मिळाली तर पूर्वनियोजन करण्यास सुद्धा व्यवस्थित वेळ मिळतो. आणि होणाऱ्या जीवितहानी, वित्तहानी आणि भयंकर दुर्घटना होण्याच्या टाळता येऊ शकतात.
डॉपलर वेदर रडारची क्षमता ४०० कि.मी. क्षेत्रावर काम करण्याची आहे आणि हवामान अंदाजाची अचूकता देखील योग्य प्रमाणात असल्याने, कोकण किनारपट्टीसह, कर्नाटक, केरळ ठिकाणी सुद्धा असे अतिरिक्त रडार बसवणे आवश्यक आहे. रत्नागिरी नजीकच्या पूरग्रस्त भागांमध्ये अशी रडार बसवल्याने महाराष्ट्र आणि विशेष करून किनारपट्टी भागातील जनतेच्या संरक्षणासाठी ते उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे रडार बसवण्याचे काम त्वरित करून, पुढील पावसाळ्याच्या आधी ते पूर्णत्वास न्यावे असे मिलिंद कीर यांनी केंद्रीय भूगर्भशास्त्र मंत्रालयातील मंत्री डॉ.जितेंद्र सिंह याना पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. जेणे करून पश्चिम घाट आणि किनारपट्टी भागामध्ये आशा प्रकारच्या रडारची स्थापना केली तर, हवामान खात्याला अचूक अंदाज वर्तविण्यासाठी समस्या निर्माण होणार नाहीत.