रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गावाचे ग्रामस्थ अजूनही प्रत्येक पावसाळ्यामध्ये समुद्राचे पाणी घरामध्ये शिरेल याच विवंचनेत दिसून येत आहेत. अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील अजून ते काम जैसे थे च आहे. समुद्राच्या घुसणाऱ्या पाण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायम आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असताना सुमारे १६९ कोटी निधी मंजूर करण्याविषयी सूचना केल्या. ८ नोव्हेंबर २०२१ ला भाटीमिऱ्या येथे बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ झाला. परंतु आजतागायत ठेकेदाराने त्याचे ५० मीटर एवढे सुद्धा कामाला हात लावलेला नाही. या बंधाऱ्यासाठी कन्सल्टिंग म्हणून मोनार्च कंपनीची स्थापना देखील करण्यात आली.
या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. आज ग्रामस्थांच्या नशिबी मात्र समुद्राचे पाण्याचेच संकट आहे. वारंवार मंजूर झालेल्या कामाच्या पूर्ततेसाठी आश्वासना व्यतिरिक्त प्रत्यक्ष कृतीत मात्र काहीच घडत नाही. त्यामुळे बंधारा समिती अध्यक्ष आप्पा वांदरकर यांनी १४ नोव्हेंबर पासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी सह्सानाक्डून एकूण १६९ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप संबंधित ठेकेदाराने सुमारे ३ हजार पाचशे मीटर लांबीच्या बंधाऱ्यामध्ये साधे ५० मीटरचेही काम केलेले नाही. त्यामुळे या कामात झालेल्या दिरंगाईची सखोल चौकशी व्हावी. तसेच संबंधित यंत्रणेला दंडात्मक कठोर कारवाईच्या मागणीसाठी मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा समितीचे अध्यक्ष शांताराम उर्फ आप्पा वांदरकर यांनी १४ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.
त्या संदर्भात जिल्हाधिकारी पशासनाला तसेच पत्तन अभियंता यांना वांदरकर यांनी गुरुवारी निवेदनही सादर केले आहे. धरणे आंदोलने करूनही या बंधाऱ्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हा बंधारा मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना आदेश दिले होते परंतु, त्याबाबत काहीच हालचाल दिसून येत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजगी व्यक्त केली आहे.