शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणारे माजी आमदार बाळ माने यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवेश केला असता तर बरं झालं असत. उदय बनेंमध्ये असे काय कमी होते की, पक्षाने त्यांना नाकारले. ही गोष्ट पण पक्षाने कार्यकर्त्यांना सांगितली पाहिजे. का डावलले याचे आम्हाला आता उत्तर हवे, त्याचप्रमाणे त्यांना ज्यांनी पक्षात घेतले आहे तर तेच आता त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतील, अशी निराश आणि बोचरी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत इच्छुक उमेदवार उदय बने यांनी दिली. निष्ठावंत राहिलो ही चूक केली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. ठाकरे शिवसेनेमध्ये भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी बुधवारी मातोश्रीवर उदय बने शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर रत्नागिरी विधानसभेतील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. विभागप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक आज झाली.
या वेळी निष्ठावंत राहिलो ही चूक केली काय, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून उमटत आहेत. याबाबत ज्येष्ठ पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उदय बने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये निष्ठावंत म्हणून आदेश पाळला. त्याची फळे मागील अडीच वर्षापासून भोगत आहोत. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन उदय बने मतदारसंघात का हवेत, याबाबत उमेदवारीची मागणी केली होती. आता उमेदवार देताना बाळ मानेंबाबत कल्पनाही देण्यात आली नाही. स्वतः बाळ माने यांना उबाठामधून उभे राहायचे असल्याने, त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते; परंतु तेही घेतले गेले नाही. आमच्यात निष्ठा कमी आहे, अनुभव कमी आहे की आम्ही कशात कमी पडतोय, हे तरी आता समजायलाच हवे. मातोश्रीवर त्यांना पक्षात घेण्याची क्रिया घडली असून यापुढे कार्यकर्त्यांमधून प्रतिक्रिया उमटतील, असेही त्यांनी सांगितले. पक्षाने त्यांना घेतले असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी तेच जबाबदारी घेतील. यापुढे कार्यकर्ते पुढील दिशा ठरवतील, असेही बने यांनी सांगितले.