गुहागर मतदारसंघात नुकताच एक पक्षांतर सोहळा पार पडला. हा पक्षप्रवेश स्थानिक आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का मानला जात असतानाच आम. जाधवांनी हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या पत्राच्या माध्यमातून आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवत मतदारसंघातील जनते सोबत देखील हितगुज साधले आहे. लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मेळावे घेणार आहे, त्यावेळेला भेटू आणि खूप काही बोलू, असंही आ. भास्कर जाधवांनी मतदारसंघातील नागरिकांना लिहिलेल्या जाहीर पत्रात म्हटलं आहे.
मलाही वेदना होतात…. – निकटवर्तीयांनी साथ सोडल्यानंतर मनातील खंत व्यक्त करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय की, मित्रांनो, मी पण म ाणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला… राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. ४० वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना? जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. परंतु थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले? आणि कोणता विकास केला? हे जरा तपासून बघा. आता जे गेले आहेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पाहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलथापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका, असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं आहे.
भगवा डौलाने फडकणार – आ. भास्कर जाधव यांच्याही पक्षांतराच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात. या चर्चा खोडून काढत आ. जाधव यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. अजून माझी आमदारकीची ४ वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे आणि हो त्याउपर याबाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला. अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपले सर्वांचे प्रेम तर माझ्यावर आहेच, त्यात अधिकची वाढ व्हावी ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो, असं आ. जाधव या पत्रात म्हणाले आहेत.