२२ जुलै रोजी कोकणामध्ये पडलेल्या तुफानी पावसामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा आंबा घाटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यवर दरडी कोसळल्याने रस्त्याची तर वाताहत लागलीच तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खचला होता. त्यामुळे गेल्या ५ महिन्यापासून आंबा घाटाची डागडुजी सुरु आहे.
रस्ते आणि दरडींची पडझड झाल्यामुळे वाहतूकीसाठी काही काळ आंबा घाट बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील डागडुजी करून केवळ लहान वाहनांच्या वाहतूकीसाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली. परंतु एस.टी व मोठी अवजड वाहनांची वाहतूक त्या मार्गावरून पूर्णपणे बंद करून सदरची वाहतूक राजापूर तालुक्यातील पाचल-अणूस्कुरामार्गे कोल्हापूर अशी सुरू करण्यात आली.
आंबा घाटाची अवस्था वाहतुकीस योग्य नसल्याने, मोठ्या वाहनांची पाचल-अणूस्कुरा मार्गे कोल्हापूर अशी वाहतून सुरू केल्यामुळे वाहतुकदारांवर मात्र त्याचा मोठा ताण पडत होता. एकतर वेळ जास्त लागत होता आणि त्यामध्ये वाढत्या इंधनाच्या दरामुळे सुद्धा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
परंतु, आज आमदार डॉ.राजन साळवी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत बंदरकर, राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता विलास पाटील, कनिष्ठ अभियंता कौशिक रहाटे यांच्याशी आंबा घाटाच्या एकूण परिस्थितीबाबत चर्चा करून, सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला असता, त्यांच्या चर्चेप्रमाणे, येत्या चार दिवसामध्ये आंबा घाट पूर्णपणे वाहतुकीस सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम चालू असल्याची माहिती दिली गेली. त्यामुळे येत्या चार दिवसांत आंबा घाट वाहतुकीसाठी सुरू होण्यास कोणत्याही अडचण येणार नाही असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
आंबा घाट पूर्ववत झाल्यास वाहतुकदाराना अनेक प्रकारे फायदा होणार असून, सर्व सामान्य जनतेला सुद्धा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होणार आहे.