कोकणामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असल्याने, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. पर्यटकांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासन आणि स्थानिक जनता प्रयत्न करत आहेत. पर्यटक वारंवार इथे परत यावेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अद्ययावत यंत्रणा देखील कार्यान्वित केल्या जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करून साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी आणि अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने काही पाऊलं उचलली आहेत. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील निवति रॉक जवळीक समुद्राच्या तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे. जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळाला आहे.
सिंधुदुर्गामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिलाच टप्पा आहे. एमटीडीसीच्या जलपर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक डॉ.सारंग कुलकर्णी हे स्वतः ही बोट घेऊन पुद्दुचेरीहून सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत पोहोचल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बोटीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ही बोट सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी आणण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग, तारकर्ली मालवण, वेंगुर्ला या ठिकाणी अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्सच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक येथून पर्यटकांचा ओढा असतो. त्यामुळे तेथील आकर्षणे वाढविण्यासाठी स्थानिक शासन प्रयत्नशील आहे. तेथील स्थानिक जनतेला सुद्धा काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने, पर्यटकांच्या आगमनाची तेथील स्थानिक आतुरतेने वाट बघत असतात.