कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे अनेक मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे म्हणजेच एमटीडीसीचे कर्मचारी सतत नवनवीन समोर आणण्यासाठी धडपडत आहेत.
स्वच्छता हीच सेवा आणि अतिथी देवो भव हे ब्रीद उराशी बाळगून पर्यटक निवासात साफसफाई, दुरूस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे खबरदारी आणि जबाबदारीने सुरू करण्यात आली आहेत. या प्रशिक्षणासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एमटीडीसी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्यामध्ये करार झाला असून महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरूण शेफ यांचा त्यांना हॉटेलचे आदरातिथ्य आणि खानपानाबाबतचे अत्याधुनिक प्रशिक्षण देत आहेत.
पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे निवास व्यवस्था. या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून, पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने पर्यटकांना आपले निवास आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात एमटीडीसीला यश आले आहे. यापुर्वीही लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने एमटीडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते.
प्राचार्या डॉ.अनिता मुदलीयार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दोन आठवड्याच्या कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत ६० हून अधिक कर्मचाऱ्यांना फूड अँड बेव्हरेजेस आणि फूड प्रोडक्शन याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येत आहे.
एमटीडीसीने राज्यातील विविध रिसॉर्टवर रेस्टॉरंटची सुविधा दिली आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी महामंडळाला त्याचा उपयोग होणार आहे. आगामी काळात महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन एमटीडीसीच्या पुणे कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.