सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता, गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना किमान महामार्गावरील खड्डे भरले जावेत अशी प्रमुख मागणी नागरिकांनी केली आहे. पण एकंदरीत असलेली मार्गाची दुरावस्था, धोकादायक झालेला परशुराम घाट या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व हे काम सुरळीत मार्गी लागावे यासाठी आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी या कोकणातील महामार्गाची झालेली परिस्थिती कथन केली.
कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी खड्डेमुक्त होणार!. इतक्या वर्षांपासून या महामार्गाचं सुरु असलेल काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. गणेशोत्सव तोंडावर आला आहे असं असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी आले होते. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पक्षीय बंधन बाजुला ठेवत कोकणच्या समस्येच्या प्रश्नी मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या गाडीतून प्रवास देखील केला.
वर्षभर मुंबईत कामानिमित्त राबणारा कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवाला गावी जात असतो. कोकणात जाणाऱ्या आणि परत मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रशासकीय यंत्रणा, एसटी प्रशासन, राज्य सरकार कामाला लागलं आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी देखील जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सभागृहात देखील कायम आग्रही असतात. महामार्गाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन त्यांनी भाजप मंत्र्यांचे परशुराम घाटात स्वागत केले. इतकेच नाही तर या प्रश्नावर थेट चर्चा करता यावी यासाठी त्यांनी परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस असा एकाच गाडीतून एकत्र प्रवासही केल्याचे पाहायला मिळाले.