नवीन वर्षाचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले आहेत. नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.
५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे, आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांची जवळपास १५ लाखाच्या आसपास घरे आहेत. ज्यामध्ये एकूण २८ लाख कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबांना या निर्णयामुळे एक दिलासा मिळाला असून, त्याचा मोठा फायदा देखील त्यांना होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षाचे एक मोठं सरप्राईज गिफ्ट मिळाले आहे.
मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच विविध प्रकारचा एवढा कर भरत आहेत, त्यांच्यासाठी विशेषकरून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझा ताण आदित्य ठाकरेंनी कमी करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधक अनेकदा आम्ही हे केलं, ते केलं असे सांगण्यासाठी होर्डिंग्ज लावतात. विकास प्रकल्प मार्गी लावणे म्हणजे मोठी गोष्ट नाही, आपण फक्त आपलं काम करत असतो. त्यामुळे जनतेच्या पैशातून स्वत:ची जाहिरात करणे हे मला पटत नाही. मात्र, राजकारणात आपण काही सांगितलं नाही तर विरोधक हे काही करतच नाही, असं म्हणतात. काही केलं तर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिकवले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो. लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक सांगितले.