वाहतूकीचे अनेक नियम असतात. जसे वाहन चालकांसाठी असतात त्याचप्रमाणे रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीसाठी नियम आखून दिलेले असतात. आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नाहीतर कोणत्या न कोणत्या तरी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. काही वेळा अपघात घडण्याची सुद्धा शक्यता असते.
मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात अभूतपूर्व निकाल दिला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे कि, रस्ता ओलांडत असताना आपण झेब्रा क्रॉसिंग वापरत नसाल आणि आपला अपघात झाल्यास त्याला वाहन चालक जबाबदार राहणार नाही. यावर न्या. एस. एस. पारवे यांच्यापुढे नुकतीच खटल्याची कारवाई पूर्ण झाली. सदर प्रकरणी उपलब्ध कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबानीवरुन फूटपाथ घटनास्थळापासून ३५ फूट दूर होता तर रोड दुभाजक १५ फूटावर होता, हे सिध्द झाले. यावरून पादचारी महिला रस्त्याच्या मध्येच रस्ता ओलांडून जात होती असे सिद्ध झाले, असे निरीक्षण न्यायालयाने निकालामध्ये नोंदविले आहे.
जसे चालकासाठी नियमावली असते तशीच रस्त्यांवर चालणाऱ्या माणसांसाठी देखील काही प्रमाणात नियम आखून दिले आहेत. पण काही जणांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे समोरच्याला भुर्दंड सोसावा लागतो. काही ठिकाणी वाहनांची वर्दळ असताना सुद्धा, काही नागरिक रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत असतात, यामध्ये एखाद्या वेळी वाहनाचा ब्रेक लागला नाही अथवा काही परिस्थिती उद्भवून, अपघात घडून आला तर त्यामध्ये वाहन चालकाला आरोपाचा ठपका ठेवून, विनाकारण शिक्षा केली जाते. त्यामुळे जिथे झेब्रा क्रॉसिंग दिले आहे तिथूनच नागरिकांनी क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडला पाहिजे, अन्यथा अपघातास रस्त्यावरील वाहन चालकास जबाबदार धरता येणार नाही आहे, असे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.