नगरपरिषदेची ब्रिटिशकालीन इमारत धोकादायक बनली असून या इमारतीच्या आवारात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तसे फलकच मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी लावले आहे. त्यामुळे साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या इम ारतीतून शहराचा प्रशासकीय कारभार केला जातो ती इमारतच धोकादायक असेल तर येथील प्रशासनाची व येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.चिपळूण शहरात शेंगदाणा बिल्डिंग म्हणून ओळख असलेली ही इमारत ब्रिटिशांनी बांधली होती.
त्याकाळात दळणवळणाचा कारभार येथून केला जात होता. शेंगदाणासाठा देखील येथे करून इतरत्र पुरवठा होत होता. ब्रिटिश गेल्यानंतर ही इमारत सरकारच्या ताब्यात आली आणि नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर या इमारतीतून नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू झाला. अनेक वर्षे येथूनच नगरपालिका प्रशासन चिपळूण शहराचा कारभार चालवत होते. चिपळूण शहराची झपाट्याने होणारी वाढ आणि त्यामुळे प्रशासकीय कामाचा वाढलेला पसारा पाहता ही इमारत कमी पडू लागली, त्यामुळे या इमारतीला जोडूनच नवीन इमारत उभारण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही इमारतीतून नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार चालू होता.
इमारत जीर्ण – दरम्यान ब्रिटिशकालीन जुनी इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत असल्याची तक्रार सतत करण्यात येत होती. काही वेळा इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट देखील करण्यात आले होते. परंतु त्यावेळी थोडीफार डागजुगी करून वेळ मारून नेण्यात आली. दरम्यानच्या काळात नगरपालिका सभागृहाने संपूर्ण नवीन अत्याधुनिक इमारतीचा प्रस्ताव पारित करून सरकारकडे पाठवला. त्याअनुषंगाने आराखडा व डिझाइन देखील तयार करण्यात आले होते. नंतर मात्र हा प्रस्ताव देखील बारगळला. त्यामुळे प्रशासकीय कारभार त्या जीर्ण इमारतीतच सुरू राहिला.
सतत पाठपुरावा केला – मुकादम गेले दोन वर्षे मी सतत या इमारती बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून इमारत धोकादायक असल्याची कल्पना दिली होती. सतत पाठपुरावा देखील करत होतो. इमारतीचा वापर बंद करा अन्यथा अनर्थ घडेल असेही पत्राद्वारे कळवले होते. मात्र गांभीर्याने घेतले गेले नाही. अहवाल आणि पत्रव्यवहार यातच प्रशासन गुंतून राहिले आणि अखेर मी जी भीती व्यक्त करत होतो ते आता समोर आले आहे. आता तरी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केली आहे.
कार्यालये हलवली – सातत्याने या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने आता ही इमारत चक्क धोकादायक बनली आहे. हा धोका ओळखून इमारतीमधील प्रशासकीय कारभार हलवण्यात आला असून सर्व कार्यालये रिकामी देखील करण्यात आली आहेत. जोडूनच असलेल्या नवीन इमारतीत प्रशासकीय कारभार सुरू करण्यात आला आहे. मात्र धोकादायक बनलेल्या इमारतीला जोडूनच नवीन इमारत असल्याने दुर्दैवाने जुनी इमारत कोसळली तर त्याचा मोठा धक्का नवीन इमारतीला देखील बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासन सतर्क – आता प्रशासनच अलर्ट झाले असून धोकादायक इमारतीच्या समोरच मोठा फलक लावण्यात आला आहे. इमारत धोकादायक असून परिसरात कोणीही ये-जा करून नये, असे स्पष्ट आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांनी केले आहे. त्यांमुळे साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील प्रशासन तसेच येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची.? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.